पणजी : गोवा विधानसभेच्या 21 जुलैपासून सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनासाठी मंगळवारी (दि. 8 रोजी) कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. अधिवेशनाच्या कामकाजावरून या बैठकीत सभापती, सत्ताधारी गट आणि विरोधकांमध्ये सुरुवातीपासूनच खटके उडाल्याने विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे येणारे पावसाळी अधिवेशन गाजणार हे निश्चित झाले आहे.
पावसाळी अधिवेशनासाठी सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचासह विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, व्हेन्जी व्हिएगस आदी उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून 8 ऑगस्टपर्यंत 15 दिवस चालणार आहे. यातील 12 दिवस मागण्यांवर तर 3 दिवस अर्थसंकल्पीय चर्चा होणार आहे. या अधिवेशनात येणार्या प्रश्नांबरोबर विरोधक आणि सत्ताधारी गटांमध्ये मतभेद दिसून आले. गेल्या आठ दिवसांमध्ये केवळ सत्ताधारी गटाचे प्रश्न घेतले जात आहेत. पूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांचे समान प्रश्न घेतले जात होते, असे विरोधकांचे मत होते. त्याप्रमाणे प्रश्नोत्तर तासात विरोधकांना संधी देण्यात यावी या त्यांच्या मागणीला सभापती तवडकर यांनी अनुमती दिली नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. याशिवाय लक्षवेधीवरूनही एकमत झाले नाही. 3 लक्षवेधी घ्याव्यात आणि त्यातील दोन लक्षवेधी विरोधकांना द्याव्यात, ही विरोधकांची मागणी सभापतींनी मान्य केली नाही. त्यामुळे या बैठकीवर बहिष्कार घातला.
राज्यात अनेक प्रश्न गंभीर बनत आहेत. यात रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, खंडित वीजपुरवठा, आरोग्याच्या समस्या, रहदारी असे अनेक प्रश्न असताना सरकारला प्रश्नच नको आहेत. म्हणूनच विरोधकांना प्रश्न विचारले जाऊ देत नाहीत. त्यांना वेळ दिला जात नाही. मात्र अधिवेशनात आम्ही रणनीती आखून सरकारला उघडे पाडणार असल्याचे आमदार व्हेन्जी व्हिएगस यांनी म्हटले आहे.
सभापती केवळ त्यांच्याच प्रश्नांना प्राधान्य देत आहेत. ही अधिवेशन जनतेचे असून जनतेच्या प्रश्नांसाठी आहे. मात्र, सत्ताधारी त्यांना हवे ते प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक प्रकारे अघोषित आणीबाणी असून लोकशाहीची हत्या आहे. सरकारला जनतेच्या प्रश्नांची जाणीव नाही. त्यामुळे सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. आम्ही कामकाजात सहभागी होण्याची मागणी करत आहे. मात्र सत्ताधारी पक्षांकडून ती डावलली जात आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.
अधिवेशनाचे कामकाज हे अधिवेशनाच्या नियमाप्रमाणे चालते. त्यात सत्ताधार्याप्रमाणे विरोधकांनाही त्यांचे प्रश्न आणि इतर कामकाज मांडण्याची संधी दिली जाते. त्याप्रमाणे ज्यावेळी कामकाज अत्यंत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सभापती रमेश तवडकर यांनी म्हटले आहे.