goa assembly winter session  Pudhari
गोवा

Goa Assembly Election | विजयना चौथी टर्म की दामू दाखवणार दम ?

Goa Assembly Election | प्रदेशाध्यक्षपद ठरू शकते वरदान : मंत्री कामत यांच्या सोबतचा सुसंवाद बजावणार महत्त्वाची भूमिका; लढत ठरणार प्रतिष्ठेची

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : विशाल नाईक

फातोर्डा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा आमदार विजय सरदेसाई आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आमनेसामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन निवडणुकांपासून सुरू असलेला हा राजकीय संघर्ष यंदा अधिकच प्रतिष्ठेचा बनला असून सासष्टीच्या राजकारणाची दिशा ठरविणारी लढत म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

एका बाजूला सलग १५ वर्षे मतदारसंघावर वर्चस्व राखणारे विजय सरदेसाई तर दुसऱ्या बाजूला भाजपची राज्य संघटना हातात असलेले प्रदेशाध्यक्ष दामू नाईक अशी ही लढत रंगण्याची चिन्हे आहेत. प्रदेशाध्यक्षपदामु‌ळे वाढलेले राजकीय वजन, पक्ष संघटनेची ताकद आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी असलेला सुसंवाद यामुळे दामू नाईक यांच्यासाठी पुन्हा एकदा राजयोगाची संधी चालून येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. फातोर्डा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या दामू नाईक यांना भाजपकडून उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष देईल तो निर्णय मान्य असेल, असे सांगितले असले तरी मतदारसंघात त्यांच्या तोडीचा प्रभावी पर्याय भाजपकडे सध्या उपलब्ध नसल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची धूरा पुन्हा एकदा नाईक यांच्या खांद्यावरच राहण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाईक यांचे राजकीय वजन वाढले आहे. राज्यभरातील पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळताना त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये स्वतःचे स्थान अधिक मजबूत केले आहे.

प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे उमेदवारीवरून स्वपक्षीय बंड होण्याची शक्यता जवळपास नाही. त्याचबरोबर निवडणूक व्यवस्थापनापासून संघटनात्मक निर्णयांपर्यंत त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय पुनरागमनाची सुवर्णसंधी मानली जात आहे. जाते. सासष्टीतील ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याशी असलेला सुसंवाद‌ही नाईक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला आत आहे.

सासष्टी तालुक्यात आजही कामत यांचा प्रभाव कायम असल्याचे मानले जाते आगामी निवडणुकीत त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिबा भाजपला लाभल्यास त्याचा फायदा नाईक यांना होऊ शकतो. त्यामुळे गेल्या तीन निवडणुकांतील पराभवांची मालिका खंडित करून पुन्हा विधानसभेत प्रवेश करण्याचा राजयोग यंदा दामू नाईक यांच्या वाट्याला येऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे दुसरीकडे, सलग तीन वेळा आमदार राहिलेले विजय सरदेसाई यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

२०१२ पासून त्यांनी फातोहात स्वतःचा मजबूत राजकीय पाया निर्माण केला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाची स्थापना करून त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका, जनसंपर्क आणि संघटनात्मक बळ या जोरावर त्यांनी मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे. मात्र, १५ वर्षांच्या कारकीर्दीनंतर यंदा मतदारांकडून त्यांच्या कामगिरीचे अधिक बारकाईने मूल्यमापन होण्याची शक्यता आहे.

मतदारसंघातील पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, नागरी सुविधा, क्रीडा विकास आणि भविष्यातील विकास आराखडा या मुद्दधांवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सलग तीन कार्यकाळानंतरही अनेक प्रश्न कायम असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

फातोडांत काँग्रेसची स्थिती मात्र अद्यापही कमकुवत असल्याचे चित्र आहे. पारंपरिकदृष्ट्वा काँग्रेसचा प्रभाव असलेल्या सासष्टी तालुक्यात फातोडी मतदारसंघात पक्षाला मजबूत संघटन उभारण्यात यश आलेले नाही. गटबाजी, अंतर्गत मतभेद, उमेदवारी जाहीर करण्यात होणारा विलंब आणि संघटनात्मक कमतरता यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार हळूहळू पक्षापासून दूर गेला, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

या परिस्थितीचा फायदा गोवा फॉरवर्डला झाला आणि काँग्रेसचा काही मतदार सस्देसाई यांच्या बाजूने वळल्याचे मागील निवडणुकांमध्ये दिसून आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय सरदेसाई यांनी महगाव मतदारसंघात वाढविलेल्या राजकीय हालचालींनी सासष्टीतील समीकरणांना नवीन वळण दिले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने मडगावमध्ये पक्ष सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

नगरपालिका निवडणुकांबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीतही मडगावमधून पक्षाचा उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. राजकीय आणकारांच्या मते, आगामी निवडणुकीत फातोहर्धातील लढत ही केवळ विजय सरदेसाई आणि दामू नाईक यांच्यातील सामना राहणार नाही, तर ही लढत १५ वर्षांच्या सताविरोधी वातावरणाविरुद्ध विद्यमान नेतृत्वाची परीक्षा, स्थानिक नेतृत्वाविरुद्ध सत्ताधारी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विकासाच्या दाव्यांविरुद्ध मतदारांच्या अपेक्षा अशा अनेक स्तरांवर लढली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT