Goa Assembly Election
पणजी : गोव्यात भाजप सरकारची कामगिरी चांगली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अन्य पक्षांतील आमदारांना भाजपमध्ये आणण्याची किंवा पक्षांतर घडवून आणण्याची आवश्यकता भासणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
दोनापावला येथे मंगळवारी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘शाश्वत गोवा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून मुख्यमंत्री म्हणून काम करताना प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव मिळाला आहे. या अनुभवाच्या जोरावर आगामी निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल आणि विजय मिळवेल, असा विश्वास आहे.
केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारच्या समन्वयातून गोव्याचा शाश्वत विकास साधण्यात आला आहे. राज्यातील विकासकामांमुळे झालेला बदल नागरिकांना स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गोवेकर पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारच्या बाजूने कौल देतील, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या गोवा दौऱ्याबाबत विचारले असता, सावंत यांनी मिश्किल टिप्पणी केली. राहुल गांधी गोव्यात आले होते; मात्र येथील उष्णता त्यांना अधिक जाणवल्याने ते थेट व्हिएतनामला गेले. तर अरविंद केजरीवाल सध्या मोकळे असल्याने अधूनमधून सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात येतात, असे ते म्हणाले.
एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी चर्चा करावी, अशी मागणी राहुल गांधी करतात. मात्र, या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची आवश्यकता नाही. आपण स्वतः राहुल गांधी यांच्याशी कुठेही जाहीर व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे खुले आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.