मडगाव : पुढारी वृत्तसेवा
गोवा विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेने तयारीला सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पडावी, यासाठी मतदान कर्मचाऱ्यांची पहिली संगणकीय यादृच्छिकीकरण प्रक्रिया (रँडमायझेशन) पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दरम्यान, दक्षिण गोवा जिल्ह्यात एकूण ६५९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान कर्मचाऱ्यांचे पहिले रँडमायझेशन दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लिट्स यांच्या देखरेखीखाली पार पडले. यावेळी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-द्वितीय रमेश गावणेकर आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी सम्राट नाईक गावणेकर उपस्थित होते.
संगणकाधारित रँडमायझेशन प्रक्रियेद्वारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान कर्मचाऱ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे निवडणूक कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने करणे शक्य होणार आहे. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदानापूर्वी प्रशिक्षणाच्या अनेक फेऱ्यांमधून जावे लागणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना निवडणुकीतील जबाबदाऱ्या, मतदान प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे.
दरम्यान, निवड झालेल्या मतदान कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश तयार करण्यात आले असून, ते लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाचे नियोजन आणि प्रशिक्षणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्ह्यात निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे.