प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या चार जणांनी हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी सुरू केली  Pudhari
गोवा

Goa Assembly Budget Session 2026 | गोवा विधानसभेत गदारोळ! प्रेक्षक गॅलरीतून घोषणाबाजी करणाऱ्या चौघांना अटक

Goa Assembly Budget Session 2026 | मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची मागणी : ज्येष्ठ मंत्री संतप्त; चौघांनाही केली अटक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच आमदार विजय सरदेसाई यांनी मिराबाग बंधाऱ्यावर विशेष स्थगन प्रस्ताव मांडून त्यावर चर्चेची मागणी केली. सभापतींनी बंधाऱ्यावर अनेक प्रश्न या पुढे येणार आहेत असे सांगून स्थगन प्रस्ताव फेटाळला.

त्याचवेळी गॅलरीत बसलेल्या चौघांनी पोस्टर हातात धरुन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ माजला. या प्रकारामुळे ज्येष्ठ मंत्री संतप्त झाले. दरम्यान, या प्रकारामुळे सभागृहाचा औचित्यभंग झाल्याचे सांगत घोषणाबाजी करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी नागरिकांना प्रेक्षक गॅलरीत बसता येते. मात्र, तिथे कोणालाही मोठ्याने बोलता येत नाही.

ही अराजकता

जलस्त्रोत खात्यावर हा प्रश्न होता. जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हे नेहमीच शांत असतात. मात्र, घोषणाबाजीवर कमालीचे संतप्त झाले. ही अराजकता असल्याचे ते म्हणाले. गेली ३५ वर्षे आपण सभागृहांमध्ये काम करतो. मात्र विरोधकांकडून गेल्या वर्षभरात नको ते अतिरेकी प्रकार होत आहेत.

मिराबाग बंधारा ही काळाची गरज आहे. साळावली धरण बांधताना तेथील दोन ते तीन गावे उठवण्यात आली. त्यावेळी लोकांनी जर विरोध केला असता तर दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा झाला नसता. विरोधक आगीत तेल ओतण्याचा प्रकार करून लोकांची दिशाभूल करून लोकांना आंदोलन करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला.

असा प्रकार सहन करणार नाही: सभापती

अशाप्रकारे सभागृहात असा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही. त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर आणि घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सभापतींनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT