गोवा : शॅक मालकच उचलताहेत समुद्र किनार्‍यावरील कचरा  pudhari photo
गोवा

Goa Beach Garbage Issue | समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याकडे पर्यटन खात्याचे दुर्लक्ष

Goa Beach Garbage Issue | ठिकठिकाणी साचताहेत ढीग; भटकी कुत्री, जनावरांकडून कचरा विखुरतोय

पुढारी वृत्तसेवा

हणजूण : पुढारी वृत्तसेवा

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत असतात. कोविड महामारीनंतर काही काळ पर्यटकांचा ओघ कमी झाला होता. त्यानंतर भारतीय पर्यटक पुन्हा गोव्याकडे वळले असले, तरी विदेशी पर्यटकांची संख्या काही प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे.

गोव्यात येणारे अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर मौजमजा आणि विरंगुळ्यासाठी येतात. यंदा आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पर्यटकांनी गोव्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील तुलनेने कमी तापमानामुळेही पर्यटकांचा ओढावाढला आहे.

पर्यटन विभागाकडून 'खा, प्या आणि मजा करा' असा संदेश दिला जात असल्याने अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर मद्यप्राशन तसेच खाद्यपदार्थ घेऊन येतात. त्यानंतर निर्माण होणारा कचरा मोठ्या प्रमाणात किनाऱ्यांवर टाकला जातो. याशिवाय नदी-नाल्यांतून वाहून आलेला कचराही पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर जमा होत असतो.

हा कचरा साफ करण्यासाठी पर्यटन खात्याने कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिली असली, तरी प्रत्यक्षात अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग दिसून येतात. कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बिन्स अनेकदा दोन ते तीन दिवस रिकाम्या केल्या जात नाहीत. त्यामुळे कचरा ओसंडून वाहतो.

या कचऱ्यातील अन्नपदार्थ खाण्यासाठी भटकी कुत्री आणि जनावरे येत असल्याने कचरा पुन्हा किनाऱ्यावर विखुरला जातो. पहाटेच्या वेळी स्थानिक नागरिक आणि पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी किंवा व्यायामासाठी येत असतात, त्यावेळी किनाऱ्यावर पडलेल्या बिअर, पाण्याच्या आणि मद्याच्या रिकाम्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थांच्या रिकाम्या पाकिटांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पर्यटन खात्याने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना अधिकार द्या

समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता योग्य प्रकारे केली जाते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना अधिकार द्यावेत, अशी मागणी किनारी भागातील समित्यांकडून करण्यात आली आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यांची साफसफाई पहाटे सहाच्या सुमारास सुरू करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT