पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील विमान प्रवासी वाहतुकीत यावर्षी जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत लक्षणीय घट झाली असून, एकूण प्रवासी संख्या ११.८२ लाखांवरून ८.६१ लाखांपर्यंत घसरली आहे. ही माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये गोव्यातील दोन्ही विमानतळांवरून एकूण ११,८२,३१६ प्रवाशांनी प्रवास केला होता.
यामध्ये ८६,४९१ आंतरराष्ट्रीय तर सुमारे १०.९५ लाख देशांतर्गत प्रवाशांचा समावेश होता. मात्र, एप्रिल २०२६ पर्यंत ही संख्या घटून ८,६१,२५४ वर आली. यामध्ये १६,२१६ आंतरराष्ट्रीय आणि ८.४५ लाख देशांतर्गत प्रवाशांचा समावेश आहे. अवघ्या तीन महिन्यांत गोव्यातील हवाई प्रवासी संख्येत ३.२१ लाखांहून अधिक घट झाली असून, ही घसरण सुमारे २७.२ टक्के इतकी आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत सर्वाधिक घसरण झाली आहे. जानेवारीत ८६,४९१ असलेली आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या एप्रिलमध्ये १६,२१६ वर आली, म्हणजेच ८१ टक्क्यांहून अधिक घट नोंदवली गेली.
यामागे हिवाळी पर्यटन हंगाम आणि आंतरराष्ट्रीय चार्टर उड्डाणांचा शेवट हे प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे. देशांतर्गत प्रवासी वाहतुकीतही घट झाली असून, ती १०.९५ लाखांवरून ८.४५ लाखांपर्यंत खाली आली आहे.
म्हणजेच जवळपास २.५ लाख प्रवासी कमी झाले आहेत. याच कालावधीत विमान उड्डाणांच्या संख्येतही घट झाली आहे. जानेवारीमध्ये ७,४२५ विमान हालचाली नोंदल्या गेल्या होत्या, त्या एप्रिलमध्ये ५,७०० वर आल्या, तर आंतरराष्ट्रीय विमान हालचाली ४८९ वरून थेट ११० पर्यंत घसरल्या.