पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्याचा कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक (एआय) आराखडा सादर करण्यासह प्रभावी एआय उपाययोजनांची चाचणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी गोव्याला सक्षम व्यासपीठ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभागातर्फे २२ व २३ ऑक्टोबर रोजी गोवा एआय टेक कॉन्क्लेव्ह २०२६ आयोजित करण्यात आली आहे. पणजीतील आयनॉक्स कोर्टयार्ड येथे होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेची संकल्पना 'लोक, पृथ्वी आणि प्रगतीसाठी एआय' अशी आहे.
या परिषदेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था, संशोधक, धोरणकर्ते आणि एआयमध्ये रस असलेले नागरिक सहभागी होणार आहेत. एआयच्या भविष्याविषयी चर्चा, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि सहकार्याला चालना देणारे व्यासपीठ म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात मुख्य मंचावरील चर्चासत्रे आणि परस्परसंवादी उपक्रमांचा समावेश असेल.
पहिले दिवशी गोवा एआय धोरण २०२६ चे अधिकृत अनावरण, गोवा एआय हॅकॅथॉनचा शुभारंभ आणि 'गोवा ग्रामीण एआयचा जीवंत ज्ञानसंग्रह' या अहवालाचे प्रकाशन होणार आहे. सरकारी विभागातील प्रशासन आणि सार्वजनिक सेवेशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांवर टप्प्याटप्प्याने उपाय शोधणे, हा हॅकॅथॉनचा उद्देश आहे.
यासाठी स्टार्टअप्स आणि नवकल्पनांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रत्यक्ष उपयोगाचे उपाय विकसित करण्याची, त्यांची चाचणी घेण्याची आणि अंमलबजावणी करण्याची संधी दिली जाणार आहे. परिषदेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सात चर्चासत्रे होतील.
पहिल्या दिवशी एआयचे भविष्य, सर्वसमावेशक आणि नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिक क्षमता केंद्रांसाठी गोव्याचे महत्त्व, पर्यटन अनुभवाला नवी दिशा देण्यासाठी एआयचा वापर आणि स्थानिक एआय नवकल्पना या विषयांवर चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्याची क्षमता, शाश्वतता, औद्योगिक क्षेत्रातील परिवर्तन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये एआयचा प्रभावी वापर या विषयांवर सत्रे होतील.
मुख्य परिषदेच्या समांतर आयोजित एआय प्रदर्शनात ३० स्टॉल्स, तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे विभाग आणि प्रात्यक्षिके असतील. विविध नामवंत संस्था आणि स्टार्टअप्स त्यांच्या कामाचे प्रदर्शन करतील. स्टार्टअप्सना कल्पना सादर करण्याची संधी देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना एआयच्या प्रत्यक्ष उपयोगाचा अभ्यास करता यावा, यासाठी 'ॲक्सेसिबिलिटी एआय क्रिएटिव्ह चॅलेंज' आयोजित केले जाणार आहे.
माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभागाने '२०३७ मधील गोव्याची कल्पना करा' या संकल्पनेवर आधारित एआय लघुचित्रफिती आणि जिंगल स्पर्धाही सुरू केल्या आहेत. एआय साधनांचा वापर करून सर्जनशील सामग्री तयार करण्यासाठी सहभागी व्यक्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.