Goa News 
गोवा

Goa News | असहायतेच्या अंधारात हवा त्यांना मायेचा आधार

Goa News | बोरीतील प्रेमावती परवार यांची कहाणी चटका लावणारी; भाची मनोरती परवार एकमेव आधार

पुढारी वृत्तसेवा

बोरी : पुढारी वृत्तसेवा

बोरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर एक मोडकळीस आलेले मातीचे घर उभे आहे. विकासाच्या योजना, कल्याणकारी योजना आणि अंत्योदयाच्या घोषणा ज्या ठिकाणी दररोज ऐकू येतात. ८१ वर्षीय प्रेमावती भिकारो परवार आणि त्यांची आजारी भाची मनोरती परवार यांचे आयुष्य मात्र उपेक्षा, दारिद्र्य आणि असहायतेच्या अंधारात अडकून पडले आहे.

प्रेमावती यांना तातडीने डोळ्यांच्या उपचारांची गरज आहे. आजार, गरिबी आणि एकटेपणा या तिहेरी संकटांशी त्या दोघी रोज सामना करत आहेत. त्यांच्या घराला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला त्यांच्या शब्दांनी चटका बसतो. जवळपास ४० वर्षांपूर्वी प्रेमावती यांच्या पतीचे निधन झाले.

संसाराचा आधार हरपला, पण आयुष्याची लढाई थांबली नाही. वाढते वय, कमकुवत होत चाललेली दृष्टी आणि गरिबी यांनी त्यांना अक्षरशः जखडून टाकले. आज त्यांच्या डोळ्यांची दृष्टी इतकी कमी झाली आहे की स्वतःचे दैनंदिन काम करणेही कठीण झाले आहे.. त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार आहे त्यांची भाची मनोरती. मात्र, नियतीने मनोरतीलाही सोडले नाही. स्वतः विविध आजारांनी त्रस्त असतानाही ती आपल्या वृद्ध मावशीची सेवा करत आहे.

प्रत्येक पावसाच्या सरीसोबत त्यांच्या मनात घर उद्ध्वस्त होण्याची धास्ती निर्माण होते. रात्री झोपताना उद्या सकाळी हे छप्पर डोक्यावर असेल की नाही, याची खात्री नसते. शेजारीपाजारी आपल्या परीने मदत करतात. कधी थोडे धान्य, कधी भाजीपाला, तर कधी दोन वेळच्या जेवणाची सोय. पण दयाळूपणाच्या या छोट्या हातांवर किती दिवस जगायचे? शासनाच्या योजना त्यांच्या दारापर्यंत पोहोचल्या नाहीत आणि नातेवाईकांच्या आधाराची आशा केव्हाच संपली आहे.

तात्पुरती वृद्धाश्रमात खानगी

स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या पुढाकाराने प्रेमावती परवार यांची तात्पुरती लोटली येथील वृद्धाश्रमात रवानगी करण्यात आली. त्यांची सेवा करणाऱ्या मनोरती परवार हिच्याबाबतचा निर्णय तिचा भाऊ आल्यानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सागर नाईक यांनी दिली. पंच जयेश नाईक यांनी पंचायतीने आजवर केलेल्या मदतीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. शासकीय अनुदान व विविध योजनांद्वारे घराच्या दुरुस्तीसह इतर आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

...अन् प्रशासन मदतीसाठी धावले

प्रेमावती यांची वेदनादायी कहाणी विविध प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. उपजिल्हाधिकारी कौशिक आमोणकर, मामलेदार कौशिक देसाई, पंचायत सचिव प्रसाद नाईक, बोरीचे सरपंच सागर नाईक, माजी सरपंच तथा विद्यमान पंच जयेश नाईक, पाणिवाडा पंच संगीता गावडे, पंच विनय बोरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने कार्यवाही सुरू केली.

फोंडा तालुका पत्रकार संघाचा पाठपुरावा

फोंडा तालुका पत्रकार संघाने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयातूनही तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू झाल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT