Goa Aditya Desai brainwashing allegation 
गोवा

Goa Aditya Desai brainwashing allegation | आदित्य देसाईंकडून वीरेश यांचे 'ब्रेन वॉशिंग'

मनोज परब यांची टीका : अंतर्गत मतभेदामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरजी पक्षात सुरू असलेल्या वादांमुळे त्यांच्या मतदारांमध्ये मोठी नाराजी तर इतर पक्षात 'सुंठेवाचून खोकला गेला' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षाध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर हे एकमेकांसमोर येणे टाळत असल्याने त्यांच्यातील दरी वाढत चालली आहे. त्यामुळे हा उज्जो पुन्हा पेटणार की आता कायमचा विझणार? अशा चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. दरम्यान, आदित्य देसाईवर परखड टीका करत त्यांनीच आमदार बोरकर यांचे 'ब्रेनवॉश केल्याचा आरोप आरजीचे पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी केला.

रविवारी पत्रकार परिषद घेत मनोज परब यांनी आपली बाजू मांडली. तसेच समोरासमोर येत सर्व मतभेद दूर करून पक्ष टिकवण्यासाठी आमदारांनीही पुढे यावे, असे आवाहन केले. मात्र त्यांनी सर्व पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माणसांशी संबंध तोडावेत, अशी अटही घातली आहे. आता सोमवारी पक्षाच्या बैठकीत वरिश बोरकर उपस्थित राहणार का आणि त्यात काय चर्चा होणार, यावर पक्षाचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.

परब म्हणाले की, इतक्या वर्षानंतर अचानक सक्रिय झालेले कायदेशीर सल्लागार, आदित्य देसाई हे तयार झालेला पक्ष हडपण्याच्या प्रयत्नात असून त्यांनीच आम्हा दोघांमध्ये दरी निर्माण केली. त्यांनी अंतर्गत कारवाया सुरू करून शुभम सावंत आणि अनुप नाईक यांच्यामार्फत सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवली, ज्याद्वारे माझी बदनामी करण्यास सुरुवात केली. त्यांनीच वीरेश बोरकर यांच्या मनात कटू भरवून पक्षात फूट पाडली.

मी शांत बसणार नाही, पक्ष पाहिजे तर घ्या!

मनोज परब यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मी शांत आणि मुत्सद्दीपणे राहणारा माणूस नाही. पक्षाध्यक्ष बदलणे, कार्यकारिणी बदलणे यासाठी अंतर्गत लॉबिंग सुरू होते. दीड-दोन वर्षांपूर्वीपासून आम्हाला याची कल्पना होती. तरीही मी गप्प राहिलो, शेवटी काहींना पक्ष हडपायचा आहे, हे कळल्यावर भी सोशल मीडियावर व्यक्त झालो. मी स्वतः आमच्या सीईसी ग्रुपमध्ये संदेश टाकून वरिशला पक्ष हवा असल्यास मी पद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

२०२७ च्या निवडणुकीपूर्वी सर्व चित्र स्पष्ट

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना आरजीमध्ये वाद सुरू आहे. आता अध्यक्ष मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांना समोर येऊन चर्चा करण्याचे आवाहन दिले असले तरी ज्या पद्धतीने रविवारची पत्रकार परिषद झाली, त्यानंतर हा वाद कितपत मिटेल हे सांगणे जरा कठीणच आहे. मात्र आमदार बोरकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? असे माध्यमांनी विचारले असता, परब म्हणाले की, येत्या निवडणुकीपूर्वी सर्व चित्र स्पष्ट होईल आणि वेळच काय ते सत्य समोर आणेल, असे वक्तव्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT