पणजी: पुढारी वृत्तसेवा: डिचोली तालुक्यातील वन म्हावळींगे येथील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) जागेत नवे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे 'जीसीए'कडून जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्टेडियमला तत्वता मान्यता दिली आहे. बीसीसीआय या स्टेडियमसाठी २५० कोटी रुपये खर्च करणार आहे. पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती 'जीसीए'चे सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली. (Goa News)
'बीसीसीआय'ची ९२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.२५) गोव्यात वागातोर येथे पार पडली. 'बीसीसीआय'चे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांच्याशी गोव्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीबाबत चर्चा केली. स्टेडियमसाठी काही वर्षांपूर्वी धारगळ येथील जागा निश्चित करण्यात आलेली होती. परंतु, मध्यंतरीच्या काळात डॉ. शेखर साळकर 'जीसीए'चे अध्यक्ष असताना स्टेडियमसाठी वन म्हावळींगे येथील सुमारे २ लाख चौरस मीटर जागा 'बीसीसीआय'ने दिलेल्या ४० कोटी रुपयांच्या निधीतून खरेदी करण्यात आलेली होती. त्यामुळे 'जीसीए'ने धारगळऐवजी वन म्हावळींगे येथे खरेदी केलेल्या जागेवरच स्टेडियम उभारावे, असे बिन्नी आणि जय शहा यांनी आपल्याला सांगितले, असे रोहन गावस- देसाई यांनी सांगितले. (Goa News)
'बीसीसीआय'कडून 'जीसीए'ला दरवर्षी सुमारे शंभर कोटींचा निधी खर्चासाठी मिळत असतो. यावर्षीही तेवढाच निधी मिळेल. स्टेडियम उभारणीसाठी लागणारा सुमारे २५० कोटींचा निधी देण्याची हमी 'बीसीसीआय'च्या अध्यक्ष आणि सचिवांनी दिलेली आहे. वन म्हावळींगे येथील जागेबाबत कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही पुढील दोन महिन्यांत स्टेडियमच्या उभारणीस सुरुवात करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
स्टेडियमच्या अभावामुळे गोव्यात गेल्या अनेक वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने झालेले नाहीत. पूर्वी फातोर्डा फुटबॉल स्टेडियमवर सामने होत. आता वन म्हावळींगे येथे स्टेडियमच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा