पणजी : पुढारी वृत्तसेवा: गोमेकॉतील आरोग्यसेवा पुन्हा सुरळीत झाली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मध्यस्थीमुळे गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंगळवारी सकाळी थेट गोमेकॉला भेट देऊन आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या.
या बैठकीस गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, अधीक्षक डॉ. राजेश पाटील, डॉ. मधू घोडकिरेकर आणि इतर वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, “डॉक्टरांची बहुतेक मागणी मान्य करण्यात आली असून गोमेकॉ परिसरात व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीवर बंदी राहील, व्हीआयपी संस्कृतीला आळा घालण्यात येईल, आणि सुरक्षेसाठी पोलीस उपनिरीक्षकासह ५० पोलिसांची नियुक्ती करण्यात येईल.”
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्याशी झालेल्या वादानंतर सोमवारी गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. आयएमएच्या डॉक्टरांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. या आंदोलनामुळे आरोग्यसेवांवर परिणाम झाला होता.
मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून डॉक्टरांची समजूत घातली व त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यामुळे डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आणि हॉस्पिटलमध्ये सेवा पूर्ववत सुरू झाली.
“आरोग्यमंत्री राणे यांनी माफी मागितलेली आम्ही स्वीकारली आहे. मात्र एखाद्या मंत्र्याने अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्ही आंदोलन थांबवत आहोत.”डॉ. मधू घोडकिरेकर