पणजी : पुढारी वृतसेवा
जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी सरकाने शनिवारी २० डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याबद्दल गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने नाराजी व्यक्त केली असून सरकारच्या या निर्णयाचा चेंबरने निषेध केला आहे.
मंगळवारी एक पत्रक जारी करून जीसीसीआयचे महासंचालक संजय आमोणकर यांनी म्हटले आहे की, लोकशाही प्रक्रियेला चेंबर पूर्ण पाठिंबा देत असताना आणि सर्व पात्र नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत असताना, चेंबरचा ठाम विश्वास आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सरसकट सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत व्यवहार्य नाही.
एका दिवसाच्या व्यत्ययामुळे उत्पादनाचे नुकसान, व्यावसायिक संधींचे नुकसान आणि अतिरिक्त परिचालन खर्च होतो. ज्यामुळे अखेरीस रोजगार आणि राज्याच्या महसुलावर परिणाम होतो.
जीसीसीआयने सातत्याने राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अशा सुट्ट्या टाळल्या पाहिजेत. १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त आधीच सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित आहे.
२० डिसेंबर २०२५ रोजी, जो शनिवार आहे, आणि त्यानंतर रविवार आहे, अशा दिवशी अतिरिक्त सुट्टी जाहीर केल्यास सलग तीन दिवस कामकाज बंद राहील. त्यामुळे औद्योगिक उत्पादकता, पुरवठा साखळी, प्रकल्पांच्या वेळापत्रकांवर नाणि सेवा वचनबद्धतेवर गंभीर परिणाम होईल, असे चेंबरनेप्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.