सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
विलवडे-धनगरवाडी येथे वस्तीच्या ठिकाणी दाखल झालेल्या ओंकार हत्तीला हुसकावण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रॅकेट शॉटचा वापर केल्याची घटना उघडकीस आली आहे. धनगरवाडी येथे मंगळवारी संध्याकाळी ओंकार हत्ती दाखल झाला असता, त्या ठिकाणी भात कापणी सुरू होती.
यावेळी भाताचे नुकसान होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी वन कर्मचारी यांना ओंकार याला हुसकून लावण्यास सांगितले असता, रॅकेट शॉटचा वापर करावा लागला, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
मागील तीन दिवस ओंकार हत्ती सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, बांदा, विलवडे, रोणापाल या गागांमध्ये फिरत आहे.
१४ वर्षीय असलेला ओंकार हत्तीने आपल्या वावरराने ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. ओंकारला बहुतांश ठिकाणी पाहण्यासाठी एकीकडे गर्दी होत आहे. तर दुसरीकडे त्याला मानवी वस्ती, शेती बागायतीपासून दूर ठेवण्यासाठी वन विभागचे आरआरटी पथक स्वतः चा जीव धोक्यात घालून अथक प्रयत्न करत आहेत.
मंगळवारी तो संध्याकाळी विलवडे-धनगरवाडी भागात आला असता तिथे ग्रामस्थ भात कापत होते. ते त्याला बघून भयभीत झाले. कापलेले भात नासधूस करेल या भीतीतीने शेतकरी यांनी त्याला शेतीपासून दूर ठेवण्याची विनंती वन कर्मचारी यांच्याकडे केली. यावेळी त्याला येथून हुसकवून लावण्यासाठी कर्मचारी यांनी सणासुडीत वापरण्यात येणारे फटाके, रॅकेट शॉट ओंकार याच्या अंगावर सोडले.
त्यामुळे बिथरलेला ओंकार याने येथून पळ काढला.
त्याला पळवून लावण्यासाठी अशा साधनांचा उपयोग करावा लागतो, अशी माहिती उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांनी दिली. तर बाहेर असल्याने त्यांनी अधिक बोलणे टाळले.