

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या या कारभारावर आक्रमक होत उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी स्थानिक आमदार व सत्ताधारी नेमके काय करतात, असा सवाल केला.
दरम्यान, तुळस येथील जखमी युवकाला मध्यरात्री डिस्चार्ज देण्याच्या प्रकारावरून ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांना घेराव घालत जाब विचारला. यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असे आश्वासन मिळाल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.
याप्रसंगी विकास बर्डे यांच्या पत्नी व नातेवाईक उपस्थित होते. तसेच जिल्हा संघटक शब्बीर मणियार, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख राजू शेटकर, उपतालुकाप्रमुख अशोक धुरी, नगरसेवक देवेंद्र टेमकर आणि इतर पदाधिकारी व तुळस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तुळस येथील विकास बर्डे या युवकाला एका व्यक्तीने मारहाण केली. या मारहाणीत विकास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. २० ऑक्टोबर रोजी झालेल्या या प्रकारानंतर जखमी विकास बर्डे यांना प्रथम तुळस प्रा. आ. केंद्रात व तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील शिकाऊ डॉक्टरांनी रुग्णाची गंभीर स्थिती असतानाही मध्यरात्री १२ वा.च्या सुमारास त्यांना थेट डिस्चार्ज दिल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला.
घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी विकास बर्डे यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना पुन्हा याच रुग्णालयात आणावे लागले. या प्रकारामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असून उपचारांमध्ये हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे.
डोक्याला मार लागलेल्या रुग्णाला किमान चोवीस तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवणे बंधनकारक असताना मध्यरात्री रुग्णाला डिस्चार्ज देणे चुकीचे असल्याचे मत रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यासाठी बेडच उपलब्ध नसल्याचे शिकाऊ डॉक्टरांकडून सांगण्यात आल्यामुळे शिवसैनिक अधिक आक्रमक झाले.