Goa Forest  Pudhari
गोवा

Goa Forest | गोव्यात वणव्यांच्या धोक्याबाबत वन विभाग सतर्क; संभाव्य धोक्यांबाबत पूर्वसूचना जारी करण्याची तयारी

Goa Forest | संभाव्य धोक्यांबाबत खात्याकडून पूर्वसूचना जारी करण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने आणि आगामी उन्हाळा आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असल्याने वन खाते वणव्यांच्या धोक्याबाबत पूर्वसूचना जारी करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, संवेदनशील क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि वणवा लागल्यास जमिनीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शास्त्रज्ञ पूर्वसूचना प्रणाली विकसित करत आहेत.

वनसंरक्षक नवीन कुमार यांनी सांगितले की, वन खाते सध्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन करत असून, पुढील तपासणीनंतर यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येतील. खाते तातडीने सूचना जारी करण्याच्या विचारत नसले, तरी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत जनतेशी संवाद साधण्याची अपेक्षा आहे. मान्सूननंतर तुरळक पाऊस पडत असल्याने सध्या चिंतेचे कारण नाही. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक तयारी केली जात आहे.

वणव्यांबाबतची प्रस्तावित पूर्वसूचना प्रणाली डिसेंबरपासून सूचना जारी करण्यास सुरवात करेल, अशी अपेक्षा आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत अल निनोचा टप्पा अपेक्षित असल्याने आगामी काही महिन्यांत परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असेही नवीन कुमार यांनी सांगितले.

बिट्स पिल्लानीच्या गोवा कॅम्पसमधील हवामानशास्त्रज्ञ आणि सहायक प्राध्यापक राजीव कुमार चतुर्वेदी यांनी सांगितले की, वन खाते आणि शास्त्रज्ञ एकत्रपणे ही पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्यासाठी तसेच तिच्यात सुधारणा करण्यासाठी काम करत आहेत. या अंतर्गत स्थानविशिष्ट वणव्यांची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित केली जात आहे. वणवा लागण्याचा धोका किती आहे, याचा अंदाज घेण्यासाठी या प्रणालीत आर्द्रतेसह विविध हवामानशास्त्रीय मापदंडांचा आणि इतर हवामान निर्देशांकांचा वापर केला जाणार आहे.
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था (इस्रो) आणि वन खात्याच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेल्या केंद्रासह वन खात्याची एकूण सहा निरीक्षण केंद्र आहेत. मात्र, ही केंद्र मर्यादित क्षेत्रावर देखरेख ठेवू शकतात. गोव्याच्या सुमारे ६७ टक्के भूभागावर जंगल आणि वृक्षाच्छादन असून, त्यात विस्तृत वन्यजीव अभयारण्ये आणि प्रादेशिक जंगलांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT