फोंडा : पुढारी वृत्तसेवा
खेळात उत्तम यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने आहार विहारावर जर योग्य लक्ष ठेवले तर सुदृढ आरोग्यप्राप्ती होण्यास मदतच होते, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. कुर्ती-फोंड्यातील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कराटे प्रात्यक्षिके व स्पर्धेच्या उद्घाटनावेळी सुभाष शिरोडकर बोलत होते.
यावेळी क्रीडा खात्याचे उपसंचालक राजेश नाईक, कराटे मुख्य प्रशिक्षक तथा असोसिएशन CHAMPIONSHIP 2025 master inivasan अध्यक्ष एस. श्रीनिवास, ब्रम्हानंद सावर्डेकर व इतर प्रशिक्षक तसेच विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते.
मंत्री शिरोडकर म्हणाले, देशात २०३६ साली ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी आजच्या विद्यार्थ्यांनी करायला हवी. आपण शिरोड्यातील खेळात चमक दाखवलेल्या एका विद्यार्थ्याला दत्तक घेतले असून त्याला आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
खेळाला आज मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अभ्यासाबरोबरच खेळाला प्राधान्य दिले तर उत्तम क्रीडापटू निर्माण करण्यास मदतच होणार आहे मात्र विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य आहार द्यायला हवा, असेही ते म्हणाले.
राजेश नाईक म्हणाले, कोणतेही शिक्षण अपुरे सोडू नका. कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाल्यानंतर अनेकजण कराटेत सातत्य ठेवत नाहीत. त्यामुळे कराटेबरोबरच स्वतःचेही नुकसान होते म्हणून सातत्य ठेवा. उच्च ध्येयप्राप्तीचे उद्दिष्ट बाळगा असेही राजेश नाईक म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक एस श्रीनिवासन यांनी केले. त्यानंतर कराटेचे विविध प्रकार घेण्यात आले.