

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेविरुद्ध मांद्रे पोलिसांनी इमिग्रेशन अँड फॉरेनर अॅक्ट, २०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवून तिला अटक केली. ती भारतात कोणत्या मागनि आली याचा तपास पोलिस करत आहेत.
चौकशीनंतर तिची रवानगी म्हापसा येथील स्थानबद्ध केंद्रात करण्यात येणार आहे. मांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल २७ रोजी सायंकाळी सुमारे ५.३५ वाजण्याच्या सुमारास हरमल पेडणे येथील एका पार्किंग परिसरात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या एका महिलेची चौकशी करण्यात आली.
चौकशीत ही महिला सारमिन बिबी (वय ३२) मूळ रहिवासी बांगलादेशची असून सध्या हरमल येथे वास्तव्यास असल्याचे उघड झाले. चौकशीत सदर महिलेकडे वैध पासपोर्ट व व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले.
तसेच तिने बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून येथे वास्तव्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिने इमिग्रेशन अँड फॉरेनर अॅक्ट, २०२५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली. अटकेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मांद्रे पोलिस करत असून, बेकायदेशीर स्थलांतर आणि परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.