fish death 
गोवा

Kapileshwari Temple | फटाक्यांच्या विषारी रसायनांमुळे कपिलेश्वर तलावातील शेकडो मासे मृत; फोंड्यात संतापाची लाट!

Kapileshwari Temple | भीषण वास्तव; विषारी, तीव्र आवाजाच्या फटाक्यांच्या निर्मितीवरच बंदीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्यावर थेट फोडण्यात आलेल्या तीव्र आवाजाच्या फटाक्यांमधून वाहून आलेल्या विषारी रसायनांमुळे कपिलेश्वर मंदिर तलावात शेकडो मृत मासे आढळल्याने उत्सवाच्या पर्यावरणीय परिणामांचे भीषण वास्तव समोर आले आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या मासेमृत्यूमुळे संतापाची लाट उसळली असून तातडीने धोरणात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल वाढत असला, तरी शाडू मातीची मूर्ती, पारंपरिक वाद्ये आणि शाश्वत साधनांचा वापर यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, उत्सवाचा पर्यावरणीय ठसा अजूनही गंभीर चिंतेचा विषय आहे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी होणाऱ्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे जलस्रोत प्रदूषित होऊन सार्वजनिक आरोग्य आणि जलचरांना धोका निर्माण होत असल्याची टीका होत आहे.

यामुळे कमी धूर निर्माण करणाऱ्या तसेच आवाज आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्याबरोबरच धूर निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या निर्मितीवरच बंदी घालण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. पवित्र जलस्रोतांच्या संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने स्थानिक जलसाठ्यांचे संरक्षण करणे आपत्कालीन गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उत्सवादरम्यान काही युवकांनी विसर्जनाच्या वेळी मंदिर तलावाच्या दगडी खांबांवर थेट मोठे फटाके फोडल्याने त्यातील कचरा आणि रासायनिक अवशेष पाण्यात पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याच्या पृष्ठभागावर मृत मासे तरंगताना दिसल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना धक्का बसला.
सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी आहे; मात्र चतुर्थादरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असल्याने लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना विषारी धुराचा सामना करावा लागतो. फटाक्यांच्या वापराचे वाढते प्रमाण हे स्थानिक रहिवाशांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. फटाक्यांवर होणारा खर्च अनेकदा सणाच्या इतर आवश्यक बाबींवरील खर्चापेक्षा अधिक असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

यामुळे निर्माण होणारा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न व्यापक असून त्याचा परिणाम संवेदनशील घटकांवर होत आहे. परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, दाट धूर आणि कानठळ्या बसवणारा आवाज ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी त्रासदायक ठरतो. तसेच पाळीव प्राणी आणि भटक्या प्राण्यांना भीतीने परिसरातून पळून जाताना दिसून आले.

एका विद्यार्थिनीच्या मते, धुरामुळे होणाऱ्या तीव्र अॅलर्जीमुळे ती विसर्जनाच्या ठिकाणी जाने पूर्णपणे टाळते. शाळेतील शिक्षक, स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून जनजागृती करावी, अशी मागणी त्याने केली.

सरकारने फटाक्यांच्या निर्मितीच्या टप्प्यावरच हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजाचे, उच्च तीव्रतेचे आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण करणारे फटाके बंद करून त्याऐवजी कमी तीव्रतेचे आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी काहींनी केली आहे.

आरोग्यास हानिकारक

रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिप्रदूषणावर निर्बंध घालणारे नियम अस्तित्वात असतानाही त्यांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. प्रदूषणात मोठी भर घालणाऱ्या स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या उच्च तीव्रतेच्या 'बॉम्ब' फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली आहे.

चिकणमातीच्या गाळाचा खत म्हणून वापर

अनेक ठिकाणी फटाकेमुक्त पद्धतीने सण साजरा केला जातो. काहीजण घरी पाण्याच्या बॅरलमध्ये विसर्जन करतात आणि त्यातून तयार होणारा चिकणमातीचा गाळ नारळाच्या झाडांसाठी खत म्हणून वापरतात. अशाच शाश्वत पद्धती इतरांनीही स्वीकाराव्यात, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. आपला उत्सव ज्या श्रद्धेचे प्रतिनिधित्व करतो, ती श्रद्धा आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या पर्यावरणाचा नाश करणारी नसावी, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT