Rahul Faldesai FIR  
गोवा

Rahul Faldesai FIR | कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्या पुत्रावर गुन्हा दाखल; रस्ता अडवून हल्ल्याचा प्रयत्न!

Rahul Faldesai FIR | धमक्या देत वाहनाचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कुडचडे पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांचे पुत्र राहुल फळदेसाई यांच्यावर ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, त्यांची सून आणि दोन लहान नातवंडे प्रवास करत असलेल्या कारचा रस्ता अडवून शिवीगाळ, धमक्या देत वाहनाचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कुडचडे पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

याप्रकरणी रात्री उशिरा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सत्तेच्या बळावर दादागिरी केल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. पंटेमळ येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शांताराम व्ही. कुडचडकर (वय ७१) यांनी राहुल फळदेसाई व अन्य तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी करत सविस्तर तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, शनिवारी २६ रोजी रात्री सुमारे ८.५५ वाजता ॲड. कुडचडकर हे आपल्या सून आणि दोन लहान नातवंडांसह मडगावकडे जात होते. पंटेमळ जंक्शन येथील राजाध्यक्ष दुकानाजवळ जीए-०७-पी-४४९९ क्रमांकाची एसयूव्ही रस्त्याच्या मध्यभागी आडवी घालून त्यांचा मार्ग अडविण्यात आला. त्यामुळे काही मिनिटांतच दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

रस्ता मोकळा करण्यासाठी सुनेने वारंवार हॉर्न वाजवून विनंती केली. मात्र, राहुल फळदेसाई वाहनातून उतरले आणि अश्लील शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली. तक्रारीत पुढे म्हटले आहे की, पंटेमळ जंक्शनमधून कार पुढे निघाल्यानंतर राहुल फळदेसाई आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन-तीन जणांनी लोखंडी रॉड व काठ्या घेऊन कारच्या दिशेने धाव घेत हल्ल्याचा प्रयत्न केला. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी कार पुढे नेण्यात आली.

मात्र, संशयितांनी एसयूव्हीमधून पाठलाग सुरू ठेवत ॲड. कुडचडकर यांच्या कारला धडक देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी सर्कल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कलपर्यंत हा पाठलाग सुरू राहिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर ॲड. कुडचडकर यांनी संबंधित वाहनाची माहिती मिळवून कुडचडे पोलिस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली. संबंधितंविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणाबाबत कुडचडे पोलिस स्थानकाशी संपर्क साधला असता, घटनेची प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारीतील आरोपांची पडताळणी करून संबंधित पक्षांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रफीत आणि इतर पुरावे तपासल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांचा याच वाहनातून पाठलाग करण्यात आला.


कुडचडे येथे वाहन चालकाने एका कुटुंबाच्या कारला अडथळा आणून त्यांना शिवीगाळ तसेच धमकी दिल्यासंदर्भात व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू असून या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

संशयितांना तत्काळ अटक करा : पाटकर

कुडचडे येथे एका ज्येष्ठ नागरिकाास एका आमदाराच्या मुलाकडून धमकावण्याचा प्रकार घडला. त्याच व्यक्तीकडून वर्षापूर्वीही चार दुचाकींना उडवण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे संशयितास तत्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. पाटकर म्हणाले की, या हल्ल्याचा निषेध करत असून संबंधितंवर तत्काळ कारवाई करून त्याची वैद्यकीय चाचणीही करावी, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्यांमध्ये त्यामुळे वचक बसेल.

तक्रारदाराकडून सीसीटीव्ही फुटेज सादर...

तक्रारदार ॲड. शांताराम कुडचडकर यांनी या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही कुडचडे पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर केले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून घटनेची पडताळणी करण्यात येणार असून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT