पणजी : पुढारी वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सुरुवात पोलिश चित्रपट 'फादरलँड'ने होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महोत्सवाचे संचालक तथा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा तथा आमदार डिलायला लोबो आदी उपस्थित होते. कोकणी आणि मराठी चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'फिल्म फायनान्सिंग स्कीम 'अंतर्गत निधी वितरित केला जात आहे. तसेच चित्रपटांच्या आवश्यक चित्रीकरणासाठी परवानग्या मिळविण्याकरिता एक खिडकी योजना राबविण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी चित्रपट हे समाजाला जोडणारे आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. यंदाच्या महोत्सवात नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांना दिग्गज कलावंतांच्या अनुभवांचा लाभ घेता यावा, यासाठी विशेष 'मास्टर क्लासेस'चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा आतापर्यंत सात हजारांहून अधिक प्रतिनिधींनी महोत्सवासाठी नोंदणी केली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारकडून ३० कोटींचा खर्च
गोव्याबाहेर इतर भाषांमध्ये कार्यरत असलेल्या गोमंतकीय कलाकार आणि तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पुरस्कार सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. इफ्फीच्या आयोजनासाठी गोवा सरकारकडून सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. महोत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
इफ्फीत १५९ आंतराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन, गोव्यात पीपीपी तत्त्वावर 'फिल्म सिटी' उभारणार
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) माध्यमातून जगभरात शांतता, एकात्मता आणि 'वसुधैव कुटुंबकम' हा संदेश पोहोचवण्याचा केंद्र आणि गोवा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
या महोत्सवात ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. महोत्सव कार्यक्रम अनावरणाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महोत्सव संचालक ज्येष्ठ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा आमदार डिलायला लोबो आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कायमस्वरूपी ठिकाण दिल्याबद्दल ते भारत सरकारचे आभारी आहेत. राज्यात चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर लवकरच भव्य 'फिल्म सिटी' उभारण्यात येईल. गोव्यात हा महोत्सव होत असल्याने स्थानिक व कोकण पट्टयातील चित्रपट निर्मात्यांना मोठी प्रेरणा मिळत आहे, असे गोवारीकर म्हणाले.