सावईवेरे : बोणये-सावईवेरे भागातील शेतकरी धर्मा गिरोडकर हे येथील डोंगरावरील आपल्या मळ्यात गेले असता त्यांच्यावर गव्याने हल्ला केला. गव्याचे शिंग त्यांच्या चेहर्याला लागल्याने ते जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मा गिरोडकर हे सोमवारी दुपारी आपल्या मळ्यावर गेले होते. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रेनकोट घालून ते जात होते. त्यांना मागून येणार्या गव्याची कल्पना आली नाही. अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले.
गिरोडकर खाली पडले व त्यांच्या तोंडाला व डोक्याला मार लागला. त्या अवस्थेतच त्यांनी लोकांना हाका मारण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन त्यांना उचलले. घरी आणल्यानंतर त्वरित त्यांना प्रथम बेतकी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गोमेकॉ इस्पितळात पाठवले. दोन दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी त्यांना घरी पाठवण्यात आले. सावईवेरे हा गाव कुळागर व डोंगराळ भाग असल्याने या पंचायत क्षेत्रातील घाणो, सावई, म्हातारभोग, शिलवाडा, बोणये या भागांत अनेकदा गवे येतात.
मागील वर्षी वेरे-वाघुर्मेचे माजी सरपंच यांच्या कुळागराचे गव्यांनी मोठे नुकसान केले होते. मे महिन्यात घाणो वाड्यावरील एका कुळागरात एक गवा फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या भागातील बागायतदारांची गव्यांकडून नासधूस केली जाते. त्यामुळे अनेक बागायतदारांना नुकसान सोसावे लागते.