

पणजी : गोवा, दक्षिण आशियातील एआय डेस्टिनेशन व्हावा यासाठी सरकारच्या माहिती, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याने (डीआयटीई अँड सी) ‘गोवा एआय मिशन 2027’चा आराखडा जाहीर केला आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आयटी मंत्री रोहन खंवटे, डीआयटीई अँड सी संचालक कबीर शिरगावकर आणि स्टार्टअपचे संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा हे केवळ पर्यटनस्थळ नसून स्टार्टअप्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये खरी प्रगती होत असलेले राज्य आहे, हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचे आहे, ’गोवा एआय मिशन 2027 चा एक भाग म्हणून, आम्ही एआय सल्लागार परिषद स्थापन करू. तसेच उद्योग व शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने शालेय स्तरावर एआय शिक्षण एकत्रित करण्याचे काम आम्ही सुरू करणार आहोत. हे मिशन राष्ट्रीय इंडिया एआय ध्येयाशी सुसंगत आहे आणि स्थानिक प्रासंगिकता, प्रवेश व संधी सुनिश्चित करून विद्यार्थ्यांना व आपल्या राज्याला ते भविष्यासाठी तयार करते.
मंत्री खंवटे म्हणाले, आम्ही सुरुवातीपासूनच धोरण, पायाभूत सुविधा, संशोधन आणि कौशल्य विकासाची उभारणी करत आहोत. गोव्यातील महाविद्यालयीन पदवीधरांसाठी 100 टक्के रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही शैक्षणिक क्षेत्र व उद्योग यांचे संरेखन करत आहोत. या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी एआय आहे.
- सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाजात बहु-भागधारकांच्या माहितीद्वारे या मिशनच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गोवा एआय सल्लागार परिषदेची योजना आहे.
- राज्यभर नैतिक, समावेशक आणि जबाबदार एआय स्वीकारण्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी गोवा एआय धोरण प्रस्तावित आहे.
- शालेय स्तरावर एआय शिक्षणाचे एकत्रीकरण हे विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी तयार करते. त्याचबरोबर भविष्यासाठी कुशल कार्यबल तयार करण्यास देखील मदत करते.
- गोवा एआय लॅब ही भौतिक जागा म्हणून डिझाइन केलेली आहे, जिथे स्टार्टअप्स एकत्र येऊन सहयोगाद्वारे आपापल्या कल्पना सामायिक करू शकतात.
- कोकणी लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) विकसित करणे, हे राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटल पद्धतीने जतन करण्यास प्रोत्साहन देण्याची अपेक्षा आहे.
- गोवा एआय इनोव्हेशन फंड आशादायी एआय स्टार्टअप्स आणि माध्यमांना इक्विटी गुंतवणूक प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे.
- सर्जनशीलता वाढविणे, उदयोन्मुख प्रतिभा ओळखणे आणि नाविन्यपूर्ण एआय उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी एआय स्टार्टअप हॅकेथॉनचा प्रस्ताव आहे.