CM Dr. Pramod sawant 
गोवा

Goa CM Pramod Sawant | अभियंतेच विकसित गोव्याचे खरे शिल्पकार

Goa CM Pramod Sawant | अभियंतेच विकसित गोव्याचे खरे शिल्पकार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : साखळी इंजिनिअर्स असोसिएशनचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

  • स्विच ऑफ'ची मानसिकता झटकण्याचे आवाहन

  • स्वतःचे ज्ञान अद्ययावत करण्याचे अभियंत्यांना सूचना

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

अभियंते हे केवळ रस्ते, पूल किंवा इमारती उभारणारे नसून समाजातील गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण करणारे आणि देशाच्या विकासाचा पाया रचणारे खरे शिल्पकार आहेत. त्यामुळे प्रत्येक अभियंत्याने साचेबद्ध विचारसरणी आणि 'स्विच ऑफ' मानसिकता झटकून नाविन्य, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची वेळ आली आहे.

बदलत्या काळाशी जुळवून घेत तंत्रज्ञानाच्या बळावर विकसित गोवा घडविण्याची जबाबदारी अभियंत्यांनी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साखळी येथील रवींद्र भवन येथे आयोजित साखळी इंजिनिअर्स असोसिएशनच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी राज्यातील विविध सरकारी विभागांतील वरिष्ठ व कनिष्ठ अभियंते, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वीज, नगररचना, पंचायत, खासगी उद्योगांतील अभियंते तसेच नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक सरकारी सेवेत कार्यरत अभियंते उत्कृष्ट ज्ञान आणि क्षमता असूनही नाविन्यपूर्ण विचारप्रक्रियेपासून दूर जात असल्याचे दिसून येते.

अनेक अभियंत्यांची कार्यपद्धती जणू 'स्विच ऑफ' मोडमध्ये गेली आहे. केवळ नोकरी करणे आणि महिन्याचा पगार मिळविणे एवढेच ध्येय न ठेवता प्रत्येक अभियंत्याने स्वतःचे ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून संशोधन, नवकल्पना आणि गुणवत्तापूर्ण कामाच्या माध्यमातून राज्याच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, अभियांत्रिकी हे भविष्य घडविणारे क्षेत्र आहे. ग्रामीण भागातील अनेक बुद्धिमान विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे या क्षेत्रापासून दूर राहतात. त्यासाठी राज्य सरकारने अभियांत्रिकी शिक्षणासाठी ७५ टक्क्यांपर्यंत शैक्षणिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र, आजही अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील शेकडो जागा रिक्त राहतात, ही दुर्दैवी बाब आहे.

सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि निधीचाही पूर्ण उपयोग होत नाही. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ऑटोमेशन, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध शाखांकडे वळावे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकासाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक मोठ्या प्रकल्पांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील अनेक तांत्रिक बाबींचे ज्ञान स्वतःलाही झाले आहे. काही वेळा अभियंत्यांचा त्रुटी दाखवून द्याव्या लागतात, ही समाधानकारक बाब नाही. अभियंत्यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत काम पूर्ण करण्याची कार्यसंस्कृती विकसित करणे आवश्यक आहे.

अभियंता हा केवळ एका विभागापुरता मर्यादित नसतो. उद्योग, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, पर्यावरण, जलव्यवस्थापन, पायाभूत सुविधा, जहाजबांधणी, स्मार्ट सिटी, डिजिटल गव्हर्नन्स अशा अनेक क्षेत्रात अभियंत्यांसाठी अमर्याद संधी आहेत. आपल्या कौशल्याचा उपयोग समाजासाठी करून विकसित भारत आणि विकसित गोवा घडवण्यात अभियंत्यांनी अग्रणी भूमिका बजावली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

साखळी इंजिनिअर्स असोसिएशनचे कौतुक

मुख्यमंत्र्यांनी साखळी इंजिनिअर्स असोसिएशनच्या स्थापनेचे स्वागत करत, ही संघटना अभियंत्यांना एकत्र आणून ज्ञान, अनुभव आणि तांत्रिक कौशल्याची देवाणघेवाण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल. गोव्याच्या विकासासाठी नवे विचार, नवी दिशा आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना देण्यात ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करून संघटनेला शुभेच्छा दिल्या.

साखळी नियोजनबद्ध वाटचाल करणारे शहर

मुख्यमंत्री म्हणाले की, पणजीनंतर साखळी हे नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे महत्त्वाचे शहर आहे. शहराचा मास्टर प्लॅन सुमारे ७५ टक्के पूर्ण झाला असून आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सर्व सुविधांनी युक्त साखळी घडविण्यासाठी स्थानिक अभियंत्यांनी पुढाकार घेऊन विधायक सूचना कराव्यात.

साखळी हे संपूर्ण गोव्यातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ४ हजार विद्यार्थी येथे विविध अभ्यासक्रम आणि कौशल्य विकास शिक्षणासाठी येतात. युवकांना आधुनिक रोजगारक्षम शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT