पणजी :उन्हाळा ऐन भरात पोहोचला असताना, जवळपास दोन महिन्यांत आतापर्यंत केवळ तुरळक ठिकाणीच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पावसाची तूट ७२.३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे
. अनेकांनी हा परिणाम एल निनोचा असल्याचे म्हटले आहे. या टप्प्यावर मान्सूनपूर्व पावसाची सरासरी ८.७ मिमी असणे सामान्य आहे. परंतु भारतीय हवामान विभागाने १ मार्चपासून या हंगामात केवळ २.४ मिमी पावसाची नोंद केली आहे. सर्वाधिक मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यात नोंदवला जातो, तर मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांतही तो पडतो. 'या वर्षी पाऊस नगण्य राहिला आहे, तर तापमान वाढत आहे,' असे एका माजी हवामान शास्त्रज्ञानी सांगितले.
एल निनो आणि ला निना
एल निनो ही प्रशांत महासागरातील उष्णकटिबंधीय भागात घडणारी एक नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे, ज्यामध्ये समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. या प्रक्रियेत दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीजवळील पाणी गरम होते, त्यामुळे जागतिक हवामान बदलांवर परिणाम होतो. एल निनोच्या अगदी उलट स्थितीला ला निना म्हणतात, यामध्ये समुद्र थंड होतो आणि भारतात चांगला पाऊस पडतो.