Goa Assembly Election 2026  
गोवा

Goa Assembly Election 2026 | गोव्यात 30 जागा लढवण्याची शिंदेसेनेची घोषणा वास्तववादी आहे का?

Goa Assembly Election 2026 | बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेने १९८९ पासून गोव्यात निवडणुका लढवायला सुरुवात केली.

पुढारी वृत्तसेवा

मयुरेश वाटवे

बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेने १९८९ पासून गोव्यात निवडणुका लढवायला सुरुवात केली. मराठी भाषिक पट्टा व 'मराठी माणूस' हा भावनिक धागा गोव्यात शिवसेनेसाठी जमेची बाजू होती. मात्र संघटनात्मक बांधणी व खमके स्थानिक नेतृत्वाअभावी सेनेला कधीही एकही आमदार मिळाला नाही.

१९८९ विधानसभा : ६ उमेदवार, ४९६० मते. १९९९ मध्ये १४ जागा लढवून ५९८७ मते. २०१७ मध्ये ३ जागा लढवून फक्त ७९२ मते म्हणजे ०.०९ मत टक्का मिळाला. सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. गोव्यात २७ वर्षांपूर्वी शिवसेनेला सहा हजारच्या आसपास मते मिळाली होती. आज गोव्याची मतदारसंख्या साडे अकरा लाखांच्या आसपास आहे. संघटनात्मक कार्य सोडा, गोव्यात अस्तित्वही नसताना ३० जागा लढवण्याची घोषणा महत्त्वाकांक्षीच म्हटली पाहिजे.

भाजपशी युती आणि 'मैत्रीचा अडथळा'

गोव्यात १९९४ व १९९९ वगळता शिवसेना कधीही भाजपसोबत युतीत लढली नाही. याचे कारण महाराष्ट्रात ३० वर्षे भाजप-सेना युती होती. "मैत्रीमुळे आम्ही गोव्याकडे लक्ष दिले नाही," असे आदित्य ठाकरे यांनी २०२२ मध्ये कबूल केले. भाजपने २०१९ नंतर 'पाठीत खंजीर खुपसल्याने' सेनेने स्वतंत्रपणे गोवा लढवायचे ठरवले.

२०२२ ची महत्त्वाकांक्षा आणि निकाल

२०२२ विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून १० जागा लढवल्या. संजय राऊत यांनी 'महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मॉडेल गोव्यात राबवू' असे म्हटले होते. पण काँग्रेसने युती नाकारली. निकालात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.

फुटीनंतर दोन शिवसेना, दोन दावे

२०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे गट एमव्हीएमध्ये राहिला. आता गोव्यातही दोन्ही गट सक्रिय आहेत.

१९ मे २०२६ रोजी उदय सामंत यांनी पणजीत जाहीर केले की शिंदे शिवसेना गोव्यात 'सुमारे 30 जागा' लढवेल. 'निवडणूक लढवणे हेच उद्दिष्ट नाही, तर गोव्यात सत्तास्थापन करायची आहे' असे सामंत म्हणाले. २०२३ मध्ये आनंद अडसूळ यांनीही 'पुढील निवडणुका लढवू, प्रचार मोहीम सुरू करू' असे सांगितले होते.

संजय राऊत अजूनही उद्धव सेनेचे गोव्याचे प्रभारी आहेत. पण २०२२ काहीच संघटनात्मक काम झालेले नाही.

घोषणा विरुद्ध वास्तव : जमिनी अंतर किती?

१९८९ ते २०२२ पर्यंत सेनेला गोव्यात एकही आमदार, १ टक्केपेक्षा जास्त मते कधीही मिळालेली नाहीत. बाळासाहेबांनंतर गोव्यात जनाधार असलेला चेहरा सेनेकडे नाही. पक्षाला २०२२ मध्ये पणजीतून उमेदवार मागे घेऊन उत्पल पर्रीकरांना पाठिंबा द्यावा लागला होता.

बाळासाहेबांच्या नावावर गोव्यात भावनिक कनेक्ट आहे, पण मतांमध्ये त्याचे रूपांतर झालेले नाही. उदय सामंत यांची ३० जागांची घोषणा महत्त्वाकांक्षी आहे, पण ०.०९ मत टक्का ते ३० जागा हे अंतर प्रचंड आहे. दोन गटांतील भांडणामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. महाराष्ट्रात शिंदे गट सत्तेत असला तरी गोव्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आमदार निवडून आणण्याएवढी पक्षाची शक्ती नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT