Raid  Pudhari
गोवा

Goa Drug Case | ड्रग्जच्या पैशातून उभारले आलिशान बंगले; पणजी ईडीची अमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई

Goa Drug Case | ईडीची कारवाई; तीन मजली निवासी बंगल्यासह अन्य दोन दुमजली घरांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अमली पदार्थांच्या काळ्या बाजारातून कमावलेल्या अवैध संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.पणजी विभागीय कार्यालयाने अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सुमारे ७.१७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस कायद्यांतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यातून ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे गोव्यातील अमली पदार्थ माफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे मार्च २०२१ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नोंदवलेल्या गुन्ह्यात आढळतात.

उगोचुकवू सोलोमन उबाबुको, इन्फिनिटी जॉन ऊर्फ डेव्हिड आणि प्रसाद वाळके यांच्या विरोधात अमली पदार्थांच्या व्यावसायिक विक्रीचा ठपका ठेवण्यात आला होता. हणजूण आणि आसगाव परिसरातील छाप्यांमध्ये एलएसडी, कोकेन, चरस आणि गांजा यांसारखे घातक अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, वाळके याच्या राहत्या घरातूनही एलएसडी जप्त करण्यात आले होते. वाळके हा या व्यवसायातील सराईत असून, यापूर्वी २०१८ मध्ये एनसीबीने तर २०२३ मध्ये गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला एमडीएमए, एक्स्टसी पावडर आणि हायड्रोपोनिक वीड यांसारख्या गुन्ह्यांत अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेला पैसा वाळके आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यांमध्ये रोख स्वरूपात जमा करण्यात आला. हा काळा पैसा बँकिंग व्यवस्थेत फिरवून त्यातून बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी करण्यात आली. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत आसगाव येथील तीन इमारतींचा समावेश आहे. यामध्ये एक तीनमजली निवासी बंगला आणि दोन दुमजली घरांचा समावेश असून, ही मालमत्ता गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नातून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT