Leel Electricals ED 
गोवा

Leel Electricals ED | लील इलेक्ट्रिकल्सच्या ११३ कोंटीच्या २२ मालमत्ता ईडीकडून तात्पुरत्या जप्त

गोव्यासह देश-विदेशात छापे; ३७६ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) जयपूर विभागीय कार्यालयाने मे. लील इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (पूर्वीचे लॉयड इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग लिमिटेड) कंपनीचे प्रवर्तक भारत राज पुंज आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्डरिंग तपासात गोव्यातील एका मालमत्तेसह देश-विदेशातील २२ स्थावर व जंगम मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या असून त्याची किंमत सुमारे ११२.९० कोटी आहे.

ही कारवाई मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत करण्यात आली असून, जप्त मालमत्तांमध्ये गोवा, दिल्ली, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील जमीन, औद्योगिक भूखंड, निवासी मालमत्ता, बँक खात्यांतील रक्कम, मुदत ठेवी (एफडी) आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा समावेश आहे, तसेच अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन येथील निवासी मालमत्ताही ईडीने जप्त केली आहे.

ईडीच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या लील इलेक्ट्रिकल्सच्या प्रवर्तक कुटुंबाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली होत्या. या मालमत्ता स्वतःच्या नावाने तसेच संबंधित कंपन्या आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून धारण करून गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा मागोवा लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा उगम दिल्लीतील केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदविलेल्या एफआयआरमधून झाला. सीबीआयने लील इलेक्ट्रिकल्स, भारत राज पुंज आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयच्या तपासात, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला खोटी आणि फेरफार केलेली आर्थिक विवरणपत्रे सादर करून सुमारे ३७६ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले. या कथित फसवणुकीमुळे एसबीआय आणि आयडीबीआय बँकेला मोठा आर्थिक फटका बसल्याचे ईडीने म्हटले आहे.

किंमत कृत्रिमरीत्या वाढवून दाखविली

ईडीच्या तपासात कंपनीच्या हिशोबांमध्ये मालमत्ता, साठा आणि येणी यांची किंमत कृत्रिमरीत्या वाढवून दाखविण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे बँकांकडून कर्ज सुविधा सुरू ठेवण्यात आल्या आणि त्यानंतर निधी विविध संबंधित कंपन्यांमार्फत वळविण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात असेही समोर आले की, हा निधी भारतातील प्रवर्तकांच्या नियंत्रणाखालील कंपन्यांमार्फत परदेशातील उपकंपन्यांकडे गुंतवणूक आणि कर्जाच्या नावाखाली पाठविण्यात आला. या निधीचा मोठा भाग परत मिळू शकला नसल्याने परदेशातील कंपन्यांचा वापर गुन्ह्यातील रक्कम लपविण्यासाठी करण्यात आल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

तो निधी विविध स्थावर मालमत्तांमध्ये गुंतविला

ईडीच्या म्हणण्यानुसार, वळविण्यात आलेला निधी नंतर गोव्यातील मालमत्तेसह विविध स्थावर मालमत्तांमध्ये गुंतविण्यात आला. यापैकी काही मालमत्ता विकून मिळालेला पैसा प्रवर्तक कुटुंबाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक खर्चासाठी वापरण्यात आला. यात भारत राज पुंज यांची आई रेणू पुंज यांच्या खर्चाचाही समावेश असल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT