पणजी : पुढारी वृत्तसेवा
हत्तींचा परिपूर्ण अभ्यास असलेली आणि हत्तींना कसे हाताळावे याचे मार्गदर्शन करणारी पश्चिम बंगाल मधील एक टीम दोडामार्गमध्ये ११ जानेवारी रोजी दाखल झाली आहे. गेले चार पाच दिवस ती टीम कार्यरत आहे.
हत्ती व्यवस्थापन करण्यामध्ये तज्ज्ञ असलेल्या सदस्यांची हुल्ला टीम (आरडाओरडा करून हत्तींना वस्तीपासून लांब हुसकावून लावण्यासाठी नियुक्त केलेले प्रशिक्षित माणसांचे पथक) प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्यातील हत्ती प्रवण क्षेत्रात दाखल झाली आहे.
या प्रशिक्षणादरम्यान वनकर्मचारी व हत्ती हाकारा गटातील मजुरांना वन्यहत्तींना मानवी वस्तीपासून दूर जंगल क्षेत्रामध्ये कसे रोखून ठेवावे, वन्य हत्तींच्या हालचालींवरून त्यांचा स्वभाव कसा ओळखावा, याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. या टीमकडून हाकारी गटातील मजूर व वनकर्मचारी यांना रात्रीच्या वेळी विविध साधने व माध्यमांचा वापर करून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
याशिवाय दोडामार्ग वन परिक्षेत्रामध्ये वन्य हत्तीच्या उपद्रवामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने हत्ती बाधित गावांमध्ये सायरन अलर्ट सिस्टिम बसविण्यात येत आहे. हाकारी गटातील मजूर व वनकर्मचारी दिवसा व रात्री वन्य हत्तींचा सातत्याने मागोवा घेत असून त्यांना प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे वन्य हत्तीचा वावर असलेल्या गावांमध्ये या सिस्टिमद्वारे सायरन वाजवून नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येणार आहे.
हत्ती गावाजवळ आल्यास किंवा येत असल्यास, हाकारी मजूर यांच्यामार्फत सायरन वाजवून शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क करण्यात येईल. त्यामुळे नागरिक जागृत राहून आवश्यक खबरदारी घेऊ शकतील. हत्तींना वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या. मात्र, त्या निष्प्रभठरल्या. त्या उपाययोजनांप्रमाणे आता सायरन अलर्ट सिस्टीम बसवण्यात आली आहे. अर्थात हा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल हे येणारा काळच ठरवेल.