Shree Damodar Devasthan 
गोवा

Shree Damodar Devasthan | देवसा गोशाळा शेड प्रकरण तापले

Shree Damodar Devasthan | देवस्थान प्रशासनाकडून चौकशीची मागणी; गोप्रेमींकडून आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

देवसा-पाडादेग (शिरवई) येथील गोशाळेच्या आठ शेड जमीनदोस्त केल्याच्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिकच तीव्र झाली आहे. एका बाजूला जांभवली येथील श्री दामोदर देवस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ दुकाळे यांनी ध्यान फाउंडेशनच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तर दुसरीकडे गोप्रेमींनी शेड पाडणाऱ्या दोषींना तातडीने अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत मंजुनाथ दुकाळे यांनी बेवारस किंवा अपघातग्रस्त गुरांच्या संगोपनासाठी कोणत्याही गोमंतकीय संस्थेने पुढे यावे, असे आवाहन केले.

अशा गुरांच्या संगोपन, उपचार आणि संवर्धनासाठी लागणारा संपूर्ण खर्च श्री दामोदर देवस्थान उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ध्यान फाउंडेशनची गोशाळा गेल्या अकरा वर्षांपासून कार्यरत असली, तरी तेथील गुरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा आरोप त्यांनी केला.

गोशाळेत आवश्यक सुविधा नसल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असल्याचे सांगत, गोप्रेमींनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. गोशाळेची शेड पाडल्यामुळे सुमारे १५० गुरे जंगलात पळाल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावत संबंधित परिसर पूर्णपणे लोकवस्तीने वेढलेला असून तिथे जंगलच नसल्याने हा दावा वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे नमूद केले.

दुकाळे यांनी ध्यान फाउंडेशनवर आणखी गंभीर आरोप करत, गोशाळेतील गुरांची कत्तलीसाठी विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला. गेल्या अकरा वर्षांतील लेखाजोखा जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, सोमवारी देवसा येथे सुमारे शंभर गोप्रेमी एकत्र येऊन शेड पाडण्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT