Dengue Death | राशिवडेतील तरुणाचा डेंग्यूने घेतला बळी File Photo
गोवा

Madgaon Dengue Case| चिंता वाढली! मडगावात डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम

Madgaon Dengue Case| मडगाव शहरात डेंग्यूचा फैलाव रोखण्याचे आरोग्य विभागासमोरील आव्हान कायम असतानाच शहरातील एका शाळेच्या व्यवस्थापनातील व्यक्तीला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

• प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र करण्याची मागणी
• आरोग्य विभागाकडून सतर्कता

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मडगाव शहरात डेंग्यूचा फैलाव रोखण्याचे आरोग्य विभागासमोरील आव्हान कायम असतानाच शहरातील एका शाळेच्या व्यवस्थापनातील व्यक्तीला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मडगाव पोलिस ठाण्याशी संबंधित तीन पोलिस कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालयाच्या पथकाने संबंधित शाळा आणि मडगाव पोलिस स्थानक परिसराची पाहणी करून डासांच्या उत्पत्तीस्थळांचा शोध घेतला असून, दोन्ही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

मडगावमध्ये डेंग्यूची प्रकरणे कमी होण्याऐवजी नवीन रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य विभागाने परिस्थिती गांभीर्याने घेतली आहे. शहरातील एका शाळेच्या व्यवस्थापनातील व्यक्तीला दोन ते तीन दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य पथकाने संबंधित शाळेची पाहणी केली. डेंग्यूचा संसर्ग कोणत्या भागातून होत आहे, परिसरात डासांची पैदास होण्यासाठी पोषक परिस्थिती आहे का आणि संभाव्य उत्पत्ती स्थळांचा शोध घेण्यात आला आहे.


मडगाव नागरी आरोग्य अधिकारी डॉ. बाप्तिस्ता फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या व्यवस्थापनातील एका व्यक्तीला डेंग्यूची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. मात्र, शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती अद्याप आरोग्य केंद्राला मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, मडगाव पोलिस स्थानकाशी संबंधित असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे यापूर्वी समोर आले होते. त्यामुळे पोलिस ठाणे परिसरातूनही डेंग्यूचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य पथकाने तेथे तपासणी केली. पोलिस ठाण्याच्या परिसरात पाणी साचणारी ठिकाणे, डासांची पैदास होण्याची शक्यता असलेले भाग आणि स्वच्छतेची परिस्थिती यांची पाहणी करण्यात आली.


आरोग्य सेवा संचालनालयाच्या पथकाने शाळा आणि पोलिस स्थानक इमारतीच्या परिसरात पाहणी करताना डेंग्यूचा स्रोत शोधण्यावर विशेष भर देण्यात आला. डासांची पैदास होणारी ठिकाणे आढळल्यास ती तातडीने नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डेंग्यूचा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी आरोग्य पथकाने शनिवारी मडगाव पोलिस ठाणे आणि संबंधित शाळेच्या परिसरात धूरफवारणी केली. डासांची संख्या कमी करण्यासाठी तसेच संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दोन्ही ठिकाणी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे डॉ. फर्नांडिस यांनी सांगितले.

पाणी साचू देऊ नका

मडगावमध्ये डेंग्यूचा धोका कायम असल्याने नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराच्या परिसरात, इमारतीच्या आवारात किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुंड्या, टाक्या, जुन्या वस्तू, टायर अथवा अन्य साहित्यांमध्ये पाणी साचल्यास त्यातून डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे अशा वस्तूंची नियमित तपासणी करून पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे, असे आवाहन केले आहे.

संवेदनशील ठिकाणी धूर फवारणी

मडगाव शहरात डेंग्यूची आणखी प्रकरणे वाढू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. शाळा आणि पोलिस ठाणे या संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून धूरफवारणी करण्यात आली असून, पुढील काळातही परिस्थितीवर नियमित लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT