Goa Assembly Election  Pudhari File Photo
गोवा

Goa Assembly Election | अस्तित्वासाठीच तिसऱ्या आघाडीची धडपड

Goa Assembly Election | प्रदेशाध्यक्ष दामू नाईक : भाजपला कोणतीही भीती नसल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही पक्षांनी तिसऱ्या आघाडीची धडपड सुरू केली आहे. मात्र भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीच्या काळात पावसाळ्यातील आळंब्यांप्रमाणे उगवलेला पक्ष नसून १९८० पासून तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बळावर जनतेमध्ये राहून काम करणारा राष्ट्रीय पक्ष आहे.

त्यामुळे गोव्यात सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीची भाजपला कोणतीही भीती नसून आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात ३० मतदारसंघांत विजय मिळवेल, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला.
मडगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना दामू नाईक यांनी राज्यातील राजकीय घडामोडी, तिसऱ्या आघाडीची चर्चा आणि फातोर्डा मतदारसंघातील भाजपच्या रणनीतीवर सविस्तर भाष्य केले. तिसऱ्या आघाडीबाबत सुरू असलेल्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, ज्या पक्षांचा जनाधार कमी होत आहे आणि ज्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे, त्यांनाच अशा आघाड्यांची गरज भासत आहे.

जनतेला अशा आघाड्यांची कोणतीही आवश्यकता नाही. जनतेचा विश्वास विकासाच्या राजकारणावर असून भाजप त्याच मार्गाने पुढे जात आहे. यापूर्वीही गोव्यात भाजपला रोखण्यासाठी अनेक राजकीय प्रयोग झाले.
तृणमूल काँग्रेससह विविध पक्षांनी मोठ्या ताकदीने निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला, मात्र गोव्याच्या जनतेने त्या प्रयोगांना साथ दिली नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या नावाखाली पुन्हा एकदा सुरू झालेल्या हालचालींमुळे भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

तीस मतदारसंघांत कमळ फुलवणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या विविध विकासकामांचा उल्लेख केला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विकास आणि संघटनेच्या बळावर जनतेसमोर जाणार असून २०२७ मध्ये राज्यातील ३० मतदारसंघांत कमळ फुलवून भाजप पुन्हा स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करेल, असा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला.

भाजपचा आप-जीएफपी आघाडीवर निशाणा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने (जीएफपी) एकत्र येत 'गोवा फर्स्ट' आघाडीची घोषणा केल्यानंतर भाजपने या आघाडीवर जोरदार टीका केली आहे. 'गोवा फर्स्ट'ची खुर्ची फर्स्ट?' असा सवाल करत भाजपचे राज्य मीडिया संयोजक तथा प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी विरोधकांच्या राजकीय युतीवर निशाणा साधला.

निवडणुकीपूर्वी नव्या नावाखाली पक्ष एकत्र आले असले तरी गोव्यातील जनतेने अशा प्रकारचे राजकीय नाट्य यापूर्वीही पाहिले आहे, असा टोला नाईक यांनी लगावला. केवळ आघाड्या बदलल्याने आणि निवडणुकीच्या तोंडावर हातमिळवणी केल्याने वास्तव बदलत नाही, असे त्यांनी म्हटले.
गोव्याला संधीसाधू राजकीय आघाड्यांची गरज नसून स्थैर्य, विकास आणि आश्वासने प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्व आवश्यक आहे, असे ते म्हणाले. 'गोवा फर्स्ट' असे नाव असले तरी प्रत्यक्षात प्राधान्य गोव्याला आहे की सत्तेच्या खुर्चीला, हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT