दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
दाबोळी वाडे येथील तळ्याच्या पाण्यात बुरशी निर्माण झाली असून या पाण्याला दुर्गंधी पसरल्याने येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दाबोळी मतदारसंघातील सदर वाडे तळे प्रदूषित झालेले आहे. इथेच गणेशभक्त गणेश मूर्तींचे विसर्जन करत असतात. चतुर्थी १५ दिवसांवर आली असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना अद्याप जाग आलेली नाही. तसेच नेते नेहमीप्रमाणे सुस्त आहेत.
आपले वाढदिवस आणि सर्व सणांच्या वेळी नेते या तळ्यातच आपले मोठेमोठे शुभेच्छा होर्डिंग लावण्यात मग्न आहेत. तळ्यातील दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वाडे तळ्याची नैसर्गिकताच लुप्त झाल्याचा नागरिकांनी दावा केला आहे.
दाबोळी मतदारसंघातील वाडे येथील तळ्याचे १५ कोटी खर्चून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तेव्हापासून हे तळे या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. सध्या या तळ्याची देखभाल होत नसल्याने तळ्याचे पाणी वर्षांनुवर्षे दूषित होत चालले आहे.
सदर तळे पालिका हद्दीत येत असल्याने तळ्याची देखभाल पालिकेने करणे क्रमप्राप्त होते. मात्र मध्यंतरी तळ्यावर चर्च संस्थेने आपला हक्क दाखवल्याने या तळ्याची देखभाल कोणी करावी हे मात्र ठरलेले नाही. त्यामुळे तळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत चालले आहे.
तसेच पूर्वी या तळ्याचे पाणी दूषित होत नव्हते, कारण या तळ्याला येथे जवळच असलेल्या समुद्रापर्यंत वाट होती. त्यामुळे या तळ्यात पाणी साचून राहत नव्हते. पाण्याचा प्रवाह तळ्यात नैसर्गिकरीत्या होत होता. आता तळ्यातील पाण्याची दर्यात जाणारी वाट बंद झाल्याने पाणी तळ्यातच राहत असल्याने सदर तळ्यातील पाणी दूषित झाले आहे.
दाबोळी-चिखली आशोय येथील झऱ्याच्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येते. मात्र हे पाणी प्रदूषित झाले आहे. सदर झऱ्याच्या पाण्यात आल्तो - दाबोळी येथील कचरा विल्हेवाट लावत असलेले सांडपाणी जात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
पुढील महिन्यात सर्वत्र गणेश चतुर्थी सण साजरा करण्यात येणार आहे. यासाठी गणेश विसर्जन करण्यात येणाऱ्या तळ्याची साफ सफाई करण्याचे काम पंचायत, पालिकेमार्फत हाती घेण्यात येणार आहे. परंतु, दाबोळी - चिखली येथील आशोय झर प्रदूषित होण्याच्या मार्गावर असल्याने येथे गणेश मूर्ती कशी विसर्जित करावी, असा प्रश्न स्थानिकांसमोर उपस्थित झाला आहे.
चिखली-आशोय झरा जुवारी नदीच्या पात्राजवळ असल्याने येथे आल्तो - दाबोळी, उत्तर डोंगरी, आशय डोंगरी, माटवे - चिखली परिसरातील नागरिक गणेश चतुर्थीला आपले गणपती चिखली आशोय येथील झऱ्याच्या पाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जन करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून आल्तो - दाबोळी येथील कचरा प्रकल्पाचे दूषित पाणी या आशोय झऱ्यात जात असल्याने संपूर्ण झऱ्याचे पाणी प्रदूषित होत चालले आहे.