Protest Pudhari
गोवा

Curtorim Mega Project Protest | कुडतरी मेगाप्रकल्पांवरून वातावरण तापले

Curtorim Mega Project Protest | आ. आलेक्स रेजिनाल्ड- मुरियानो रिबेलोंमध्ये शाब्दिक चकमक

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुडतरी मतदारसंघात प्रस्तावित चार मेगाप्रकल्पांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाप्रकल्पांच्या विरोधात सरपंच सौम्य भूमिका घेत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आमदार अलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांची भेट घेत गावात कोणत्याही परिस्थितीत महाप्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य मुरियानो रिबेलो यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

'तुम्ही आमदार झाल्यानंतर मदत केली असेल; पण मी कोणतेही पद नसतानाही शेतकऱ्यांसाठी काम करत आहे,' अशी टीका मुरियानो रिबेलो यांनी करताच बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कुडतरी गावात प्रस्तावित मेगा प्रकल्पांविरोधात ग्रामस्थांनी पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकल्पांना गावकऱ्यांचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट केले.

यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांची भेट घेऊन आपल्या मागण्या आणि चिंता त्यांच्यासमोर मांडल्या. सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. प्रस्तावित प्रकल्पांविरोधात पंचायत प्रशासनाकडून अपेक्षित तीव्र भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

गावकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांना अधिक ठाम पाठिबा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मुरियानो रिबेलो यांनी चर्चेदरम्यान कुडतरी मतदारसंघात चारपेक्षा अधिक महाप्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगत, त्याविरोधात आवाज उठवूनही सरपंच सौम्य भूमिका घेत असल्याची तक्रार केली.

महाप्रकल्प आल्यास त्यांचे सांडपाणी तळ्यात मिसळून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली मुरियानो रिबेलो यांनी या प्रकल्पांना विरोध करण्यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनीही 'त्या प्रकल्पांशी आपले काहीही घेणे-देणे नाही,' असे सांगत गावातील शेतकऱ्यांना आपण मोठ्या प्रमाणावर मदत केल्याचा दावा केला. त्यावर प्रत्युत्तर देताना मुरियानो रिबेलो यांनी, 'मी आमदार नसतानाही शेतकऱ्यांना मदत करत आहे,' असे ठामपणे सांगितले.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनी, संबंधित जमीन स्थानिकांनी एका गोमंतकीय बिल्डरला दिली आहे. ग्रामस्थ जे सांगतील त्यानुसार निर्णय घ्यावा, अशा सूचना सरपंचांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गावाच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रकल्पाविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांचा तीव्र विरोध

ग्रामस्थांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी प्रकल्पाच्या जागेबाहेर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कुडतरी सरपंचांनी प्रकल्प परिसराभोवती उभारलेले कुंपण हटविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर ग्रामस्थांनी आमदारांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन सादर केले. गावात कोणत्याही प्रकारचा मेगा प्रकल्प नको असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अशा मोठ्या प्रकल्पांमुळे कुडतरी गावाची पारंपरिक ओळख, पर्यावरण आणि स्थानिक जीवनशैली धोक्यात येईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT