मडगाव : पुढारी वृत्तसेवा
पालिकेच्या तिजोरीत कायमस्वरूपी महसूल जमा व्हावा तसेच सर्वसामान्य नागरिकांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याची संधी मिळावी या उद्देशाने लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेले कुडचडे-काकोडा नगरपालिकेचे अधिकृत सुदा मार्केट सध्या भाजीपाला साठवण्याचे गोदाम बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मार्केटमधील गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला साठवून ठेवला जात असून अनेक विक्रेते बाहेर रस्त्यावर अतिक्रमण करून खुलेआम भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे पालिकेच्या महसुलाला गळती लागली असून शहरातील वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहणारे कुडचडे-काकोडा नगरपालिकेचे सुदा मार्केट आता बेकायदेशीर गोदामांच्या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. महसूल निर्मितीच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून अनेक दुकानदारांनी गाळ्यांचे भाजीपाला गोदामात रूपांतर केले आहे.
प्रत्यक्ष विक्री मात्र रस्त्यावर अतिक्रमण करून सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या या सुदा मार्केटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊनही प्रशासनाला त्याची माहिती नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सकाळपासूनच मार्केटबाहेरील परिसरात भाजी विक्रेत्यांची गर्दी होत असते. रस्त्यांच्या कडेला, फूटपाथवर तसेच सार्वजनिक जागांमध्ये भाजी विक्री सुरू असल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कुजलेल्या भाज्या, प्लास्टिक पिशव्या आणि कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
प्रत्यक्ष कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी केवळ नोटिसांवर न थांबता तातडीने प्रत्यक्ष कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधिकृत बाजार रिकामा आणि बाहेरील रस्ते व्यापलेले अशी परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात शहरातील वाहतूक आणि स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.