म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली रामनगर (कर्नाटक) येथील एका पर्यटक दाम्पत्याची ९९ हजार ४३० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी जीओआयआय व्हेकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक गौरेश रत्नाकर शिरोडकर (रा. डोंगरी, मांडूर तिसवाडी) याला अटक केली. तर, कंपनीचा प्रतिनिधी बदरूद्दीन कमल खान आणि एक अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.
हा फसवणुकीचा प्रकार ७ सप्टेंबर रोजी हडफडे येथे घडला होता. याप्रकरणी पर्यटक निदा कनीस फातिमा (रा. रामनगर, कर्नाटक) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी संशयितांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार निदा पती मोहम्मद कौसेर यांच्यासोबत गोव्यात पर्यटनासाठी आल्या असता त्यांची फसवणूक झाली होती. आरोपी जीओआयआय व्हॅकेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत होता.
या कंपनीद्वारे कर्मचारी विविध मार्गानी, स्क्रॅच कार्ड वाटून, संभाव्य ग्राहकांना आकर्षित करत असत. त्यानंतर, ग्राहकांना हडफडे येथील हॉटेल लेमन ट्रीमध्ये नेले जात असे, जिथे कंपनीचे इतर कर्मचारी त्यांना विविध हॉलिडे पॅकेजबद्दल माहिती देऊन पैसे भरण्यास प्रवृत्त करत असत. प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादीचीही अशाचप्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. संशयित आरोपी गौरेश शिरोडकर याला म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.