पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजपच्या गोवा भाजप भवनच्या उद्घाटनाआधी काँग्रेसच्या नव्या भवनचे उद्घाटन होऊ शकते. मात्र, त्यासाठी निधी मंजुरीची गरज आहे, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
भाजपने आपल्या नव्या भाजप भवनचे उद्घाटन ६ सप्टेंबर रोजी निश्चित केले आहे. त्याआधी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी पाटकर पुढे सरसावले आहेत.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पाटकर यांनी म्हटले आहे की, भाजपच्या गोवा कार्यालयापूर्वी आपण काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार होतो.
पण, ते होण्याआधीच मला पक्षाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. कार्यालय तयार आहे आणि निधी उपलब्ध करून दिल्यास, आम्ही त्याचे उद्घाटन उद्याही करू शकतो. आता हा निर्णय पक्षाचा आहे; हे केवळ दोन मिनिटांचे काम आहे, असे पाटकर यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी भाजपच्या कदंब पठारावरील भाजप कार्यालयात पूजा पार पडली होती. त्याशिवाय येत्या ६ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात येत असल्याने त्यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची सध्या चर्चा आहे. तर भाजपचा प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कार्यालयाचा मुद्दा पुढे आला आहे.
कारण पुन्हा प्रदेशाध्यक्ष झालेल्या गिरीश चोडणकर यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमावेळी खजिनदार दत्ता नायक यांनी नव्या कार्यालयाची कल्पनाही मांडली होती. परंतु, काँग्रेसचे कार्यालय भाजपच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनापूर्वी करण्याचा अमित पाटकर यांचे प्रयत्न होते; परंतु त्यांनाच पदावरून हटवल्याने हा विषय मागे पडला होता. आता पाटकर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सरसावले असल्याने काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
नवीन कार्यालयाचे काम पूर्ण झाले असून ते उद्घाटनासाठी सज्ज आहे. मात्र, संबंधित देयकाची मंजुरी अद्याप झालेली नसल्याने उद्घाटनाला विलंब होत असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले. यावेळी पाटकर यांनी भाजपवरही निशाणा साधला. मोठ्या पक्ष कार्यालयाच्या उभारणीसाठी भाजपने भ्रष्टाचाराचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसने मात्र भ्रष्टाचारमुक्त कारभाराची भूमिका कायम ठेवली असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाची तारीख देयक मंजुरीनंतर निश्चित होणार असून, पक्षाच्या आगामी संघटनात्मक कार्यक्रमांसाठी हे कार्यालय महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.