Snake Bite Pudhari
गोवा

Snake Bite Death | चार वर्षांत सर्पदंशाने 30 जण गतप्राण

Snake Bite Death | 2020 ते 2024 या काळात तब्बल 1,663 घटना; दरवर्षी 500 ते 600 घटनांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी

फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचा अनमोड घाटात सर्पदंशाने मृत्यू झाला आणि राज्यभरात खळबळ माजली. पाठोपाठ सर्पदंशाबाबतची आकडेवारीही समोर आली. राज्यात २०२० ते २०२४ या ४ वर्षांत सर्पदंशाच्या तब्बल १,६६३ घटना घडल्या आणि यात ३० जणांचा मृत्यू झाला. सर्पदंशाचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असल्याचे दिसून आले. हे प्रमाण साधारणपणे दिवसाला दोन इतके आहे. याबाबतच्या अभ्यासानुसार २१ ते ३० वयोगटातील तरूण हा सर्वाधिक प्रभावित गट होता, तर एकूण प्रकरणांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक होते.

शिवाय सर्पदंशाच्या घटना ग्रामीण भागात व वनक्षेत्रात घडल्या आहेत. राज्यात दरवर्षी ५०० ते ६०० सर्पदंशाच्या घटनांची नोंद होते. ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे. भारतात प्रामुख्याने नाग, मण्यार, घोणस, फुरसे, तर गोव्यात वरील प्रजातींसह किंग कोब्रा, चापडा आणि पोवळा हे विषारी साप आढळतात. साप विषारी आहे की बिनविषारी हे त्याच्या डोक्याचा आकार, डोळ्यांची बाहुली, शेपटी आणि चावल्याच्या खुणा यावरून सहज ओळखता येते. साप ओळखण्यासाठी डोक्याचा आकार आणि खवले यांची पाहणी करावी विषारी सापाचे डोके त्रिकोणी आकाराचे असते आणि डोक्यावर लहान खवले असतात.

बिनविषारी सापाचे डोके निमुळते किंवा गोलाकार असते आणि डोक्यावर मोठे खवले असतात. विषारी सापाची डोळ्यांची बाहुली उभी किंवा अंडाकृती (चिरलेली) असते. बिनविषारी सापाची डोळ्यांची बाहुली पूर्णपणे गोल असते. विषारी सापाची शेपटी अचानक निमुळती आणि लहान होते. बिनविषारी सापाची शेपटी लांब आणि हळूहळू विषारी सापाची पोटाच्या खालच्या भागातील खवले संपूर्ण पोटावर पसरलेले असतात, बिनविषारी सापाचे खवले पोटाच्या मध्यभागी एका ओळीत असतात. सर्पदंश झाल्यास विषारी साप चावलेल्या जागेवर दोन मोठे सुळे (विषारी दात) टोचल्याच्या ठळक खुणा दिसतात आणि इंग्रजी यू आकार दिसतो. बिनविषारी साप चावल्यास दातांच्या बारीक अनेक खुणा दिसतात, पण सुळ्यांच्या दोन ठळक खुणा नसतात.

वर्गवारी विषारी, बिनविषारी सापांची

सापांची वर्गवारी त्यांच्या विषारी किंवा बिनविषारी असण्यावर तसेच त्यांच्या दात आणि विषाच्या रचनेवर आधारित असते. विषारी (व्हेनोमस स्नेक्स) सापांच्या वरच्या जबड्यात विषारी दात आणि विषग्रंथी असतात. विषारी सापांचे वर्गीकरण त्यांच्या विषाच्या प्रकारानुसार केले जाते. न्यूरोटॉक्सिक हे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते. (उदा. नाग आणि मण्यार), हेमोटॉक्सिक हे विष रक्ताच्या पेशींवर आणि अभिसरण संस्थेवर परिणाम करते, ज्यामुळे अंतर्गत खत्तस्त्राव होतो. (उदा. घोणस.) सायटोटॉक्सिक हे विष दंश केलेल्या भागातील पेशी नष्ट करते.

(उदा. फुरसे) बिनविषारी सापांमध्ये विषग्रंथी किंवा विषारी दात नसतात. ते चावल्यास फक्त जखम होते. (उदा. अजगर, धामण, आणि कवड्या) निमविषारी / कमी विषारी सार्याच्या जबड्याच्या मागील बाजूस विषारी दात असतात. त्यांचे विष माणसासाठी सहसा जीवघेणे नसते, पण लहान प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा मारण्यासाठी त्याचा वापर होतो (उदा. चंदेरी), भारतात प्रामुख्याने नाग, मण्यार, घोणस आणि फुस्से हे चार अतिविषारी साप आढळतात. याशिवाय किंग कोब्रा, चापडा, पोवळा, आणि समुद्री साप देखील विषारी असतात.

चापडा सापाविषयी

चापडा (बम्बू पिट व्हायपर/हिरवा घोणस) हा अतिविषारी साप गोव्यात आढळतो. हा प्रामुख्याने भारताच्या पश्चिम घाट परिसरात आढळतो. हा साप प्रामुख्याने पोपटी, हिरवा किंवा शेवाळी रंगाचा असतो. त्यामुळे तो झाडांच्या पानांमध्ये सहज लपून राहतो. याचे डोके बाणाच्या टोकासारखे त्रिकोणी आणि चपटे असते. हे प्रामुख्याने झुडपे, बांबूची वने आणि वेलींवर राहतात. पावसाळ्यात ते झाडांवर चढणे पसंत करतात.

हा साप अतिशय चिडखोर आणि रागीट जातीचा आहे. आक्रमक असल्यामुळे जवळ आल्यास पटकन देश करतो. हा अतिविषारी साप असून त्याच्या दंशामुळे मानवी शरीरातील रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो. या सापांचे वैशिष्ट्य म्हणजे अंडी न घालता ते थेट पिल्लांना जन्म देतात. गोव्यात चापडा साप मलबार, नाकाड्या आणि कॉमन या तीन प्रकारात आढळतो. या सापाचा दंश जीवघेणा असतो. या सापावर वेगळे प्रतिविष नाही. हा चावल्यास इतर उपलब्ध प्रतिविष दिले जाते.

पोवळा सापाविषयी...

दूसरा विषारी साप गोव्यात आढळतो तो पोवळा. हा भारतातील सर्वात लहान आणि दुर्मीळ विषारी सापांपैकी एक आहे. हा साप प्रामुख्याने पश्चिम घाट आणि कमी पाणी असलेल्या नदीकाठच्या भागात आढळतो. पोवळा हा अतिशय लहान आणि सडपातळ साप आहे. याचा रंग तपकिरी किंवा काळपट असतो, आणि त्याच्या अंगावर फिकट रेषा असतात. त्याच्या शेपटीचा भाग लाल किंवा केशरी रंगाचा असतो. हा अत्यंत विषारी सर्प आहे. मात्र तो अत्यंत शांत स्वभावाचा असून सहसा मानवावर आक्रमण करत नाही. जर त्याला कोणी डिवचले किंवा त्रास दिला, तर तो आपली शेपटी वर करून केशरी/लाल रंगाचा भाग दाखवतो, जेणेकरून शत्रू घाबरेल.

सापाचे विष हे न्यूरोटॉक्सिक असते, म्हणजेच ते थेट मज्जासंस्थेवर परिणाम करते. चावलेल्या भागात तीव्र वेदना होतात आणि सूज येते. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. चावल्यानंतर २० ते ३० मिनिटांत श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. हा साप सहसा मानवी वस्तीत येत नाही. दलदलीचा भाग, ओलसर माती, आणि पानगळीची जंगले ही त्याची राहण्याची ठिकाणे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या पश्चिम घाट परिसरात याचे वास्तव्य असते.

गोव्यातही आढळतोय किंग कोब्रा

किंग कोब्रा (नागराज) हा जगातील सर्वात लांब विषारी साप अलीकडे गोव्यात अनेक ठिकाणी आढळतो. नुकताच असोडे सत्तरी येथे घरात घुसलेल्या किंग कोब्राला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. आशिया खंडात प्रामुख्याने आढळणारा हा साप सामान्य नागापेक्षा वेगळा असतो. हा जगातील सर्वात लांब विषारी साप असून, त्याची लांबी सरासरी १२ ते १३ फूट असते. मात्र, काही किंग कोब्रा १८ फुटांपर्यंतही वाढू शकतात. याचे विष अत्यंत प्राणघातक असते.

एका देशामध्ये तो इतके विष सोडतो की, एकाच वेळी २० माणसांचा मृत्यू होऊ शकतो. किंग कोब्राचे मुख्य खाद्य धामण, लहान अजगर आणि इतर विषारी साप हेच असते. हा प्रामुख्याने पश्चिम घाट, कर्नाटक, केरळ, ईशान्य भारत आणि महाराष्ट्रात (विशेषतः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोवा सीमा भागात) घनदाट जंगलात आढळतो. त्याला डिवचल्यास किंवा स्वतःचा बचाव करताना हा साप चक्क माणसाच्या डोळ्याला डोळा मिडवून जमिनीपासून ३ ते ४ फूट उंच फणा उभारू शकतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील मोजक्याच सापांपैकी किंग कोब्रा हा असा एकमेव साप आहे जो अंडी घालण्यासाठी स्वतः पालापाचोळा व गवताचे घरटे बनवतो आणि मादी घरट्यात १५ ते ३० अंडी घालून पहारा देते. नष्ट झालेला अधिवास, अन्नाचा शोध आणि किंग कोब्राला ठार न मारण्याबाबत झालेली जनजागृती यामुळे अलीकडे किंग कोब्रा मानवी वस्तीत आढळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT