पणजी : पुढारी वृत्तसेवा
असे म्हटले जाते की, प्रत्येक माणसात एक कलाकार दडलेला असतो. मग तो एखादा गुन्हा घडल्यामुळे शिक्षा भोगत असलेला कैदीही का असेना. कोलवाळ कारागृहातील कैदीही त्याला अपवाद ठरलेले नाहीत. भलेही भूतकाळात घडलेल्या अपराधामुळे ते कैदी बनले असले तरी सध्या त्यांच्यातील कलाकारीही समोर आली आहे.
कधी काळी हातून गुन्हा घडल्याने कारागृहात शिक्ष बरोबरच कलेचे प्रशिक्षण घेत असलेले कोलवाळ कारागृहातील कैदी दरवर्षी विविध सणासुदीनुसार कारागृहात गणेशमूर्ती तसेच आकाशकंदील व चांदण्या (स्टार्स्) यासारख्या पर्यावरणपूरक वस्तू बनवतात व त्याला प्रतिसादही चांगला मिळतो.
कारागृहातील गणेश चित्रशाळेत, विविध आकारांच्या मातीकामाच्या कौशल्यातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांची विक्री बाजारभावापेक्षा कमी दरात आहे. या मूर्ती तुरूंगाच्या मातीकाम विभागात काम करणाऱ्या कैद्यांनी बनवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते या गणेशमूर्तींच्या कामात मग्न होते. त्यांनी या गणेशमूर्तींना केलेली रंगरंगोटी सुबक व आकर्षक आहे, अशी माहिती या औद्योगिक युनिटचे प्रभारी विलास परब यांनी दिली.
या मूर्ती पारंपरिक मातीपासून बनवलेल्या असल्याने पर्यावरणपूरक आहेत. या मूर्तींसाठी लागणारी चिकटमाती मांद्रे येथून आणण्यात आली. एक फूट, दीड फूट आणि तीन फूट अशा आकारांमध्ये या मूर्ती उपलब्ध आहेत. खरेदीदारांसाठी डिलिव्हरीची व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आलेली आहे.
आधुनिक मध्यवर्ती कारागृहात मदत करण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक उत्पादन उपक्रमांपैकी मातीची भांडी बनवणे हा एक उपक्रम आहे.
सणासुदीच्या काळात रहिवासी आकाश कंदील, नागोबाच्या मूर्ती आणि नरकासुराचे मुखवटे देखील बनवतात.
मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक सुचिता देसाई आणि कारागृह कर्मचारी कैद्यांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. नागोबा मूर्तींना मिळालेल्या प्रतिसादानंतर, मातीकाम विभागातील कैद्यांनी यावर्षी पुन्हा गणेशमूर्ती बनवण्याचे काम हाती घेतले आहे.
उत्पादकपणे आणि अशी कौशल्ये आत्मसात करावीत, जी या कैद्यांना सुटकेनंतर उपयोगी पडतील हा यामागील उद्देश आहे. कारागृह विभागात सुगंधी मेणबत्त्या, मासिकाच्या कागदापासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू, लाकडी वस्तू आणि संगणक टेबल बनवण्याचे उत्पादन युनिट्स आहेत.
फोंडा येथील एका स्थानिक व्यावसायिकाने या मूर्तींची मोठी ऑर्डर देऊन कैद्यांच्या या उपक्रमाला मोलाचा हातभार लावला आहे. नागरिकांनी कैद्यांनी साकारलेल्या या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची पुढे येऊन खरेदी करावी, असे आवाहन परब यांनी केले आहे.
दरवर्षी सणासुदीनुसार कैदी कारागृहात दिवाळीसाठी आकाशकंदील, परफ्युमच्या मेणबत्त्या, नाताळासाठी चांदण्या (स्टार्स्), गणेशचतुर्थीसाठी गणेशमूर्ती बनवतात. यावर्षी ५० गणेशमूर्ती विविध आकाराच्या बनवण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी ३०० आकाशकंदील व ८०० चांदण्यांची (स्टार्स्) विक्री झाली तर यावर्षी ५०० आकाशकंदील व १ हजार चांदण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कारागृह अधिकारी विलास परब यांनी दिली.