Drug smuggling Case Pudhari File Photo
गोवा

Goa Colvale Jail Drug Smuggling-कोलवाळ जेलमधील ड्रग्ज तस्करी रोविना लोबोसाठी

सुरक्षा रक्षकापाठोपाठ रोविना लोबोला अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दुहेरी हत्याकांडातील आरोपी असलेल्या रोविना लोबोला कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात गांजा आणि चरस पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आल्याने रोविनाला अटक करण्यात आली. तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

जीएचआरडीसीची संशयित सुरक्षा रक्षक आशा रेवानंद चोडणकर हिने चौकशीदरम्यान गांजा आणि चरस हे महिला विभागातील कैदी रोविना लोबो हिला देण्यासाठी आणल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी रोविना लोबो हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. या प्रकरणातील तिच्या कथित सहभागाच्या आधारे तिला अटक करण्यात आली. कारागृहातील अमलीपदार्थ तस्करी रॅकेटमध्ये रोविना लोबोची नेमकी भूमिका काय होती, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कोलवाळ पोलिस करीत आहेत.

कारागृह प्रशासनाला कर्मचाऱ्यांमार्फत प्रतिबंधित वस्तूंची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पाळत ठेवली होती, मंगळवारी सकाळी कर्तव्यावर येताना आशा चोडणकर हिच्या दोन थर्मासच्या तळाशी लपवून ठेवलेला ६५० ग्रॅम गांजा आणि २ ग्रॅम चरस असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तिच्याकडून दोन मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आले. याशिवाय आशा चोडणकर हिच्या लॉकरच्या तपासणीत आणखी तीन मोबाईल फोन आणि तीन एटीएम कार्ड सापडले. कारागृह अधीक्षक सुचिता देसाई यांच्या तक्रारीनंतर तिच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

रोविना दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित

रोविना लोबो ही २०२० मध्ये इंग्रजवाडा-मार्ना, शिवोली येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी असून, ती कोलवाळ कारागृहात न्यायप्रविष्ट बंदी म्हणून होती. मार्च २०२६ मध्ये तिला या प्रकरणात जामीन नाकारण्यात आला होता. आता कारागृहातील अमली पदार्थ तस्करी प्रकरणातही तिचे नाव समोर आल्याने तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा

या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित सुरक्षारक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल आणि चौकशीअंती कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. कारागृहात अमली पदार्थांची तस्करी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT