Pirwaadi Beach Safety Pudhari
गोवा

Colva Beach Sewage Pollution 2026 | कोलवा समुद्रात थेट सांडपाणी

Colva Beach Sewage Pollution 2026 | परिसरात दुर्गंधी; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी पहाटे कोलवा येथील नाल्यातून काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त पाणी थेट समुद्रात मिसळताना दिसून आले.

या प्रकारामुळे समुद्रकिनाऱ्यावर दुर्गंधी पसरली असून त्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर होऊ लागल्याची तक्रार स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोलवा समुद्रात सांडपाणी सोडण्याच्या प्रकरणी काही वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बॉम्बे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्रात कोलवा समुद्रकिनाऱ्यावर सार्वजनिक स्वच्छतागृहे कार्यान्वित करण्यात आली असून त्यातील सांडपाणी स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

तसेच सांडपाणी थेट समुद्रात सोडले जाणार नाही, यासाठी जलसंपदा विभागाला नोटीस देण्यात आल्याचे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंटस् तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई सुरू असल्याचेही मंडळाने न्यायालयात नमूद केले होते. मात्र, मंगळवारी पहाटे समोर आलेल्या प्रकारामुळे या सर्व दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोलवा येथील नाल्यातून काळे, प्रदूषित पाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी व कचरा समुद्रात मिसळत असल्याने समुद्रकिनाऱ्यावरील पाणी दूषित झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

सकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी किंवा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. स्थानिकांच्या मते, कोलवा हा राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक येथे भेट देतात.

मात्र, अशा प्रकारे समुद्रात सांडपाणी सोडले जात असल्यास कोलवा समुद्रकिनाऱ्याची प्रतिमा मलिन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांना दुर्गंधीयुक्त व दूषित वातावरणाचा सामना करावा लागत असल्यास त्याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर होऊ शकतो, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

सरकारची इच्छाशक्तीच नाही : आल्मेदा

कोलवा नागरिक कृती समितीच्या सचिव जुडिथ आल्मेदा यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोलवा सिव्हिक अँड कंझ्युमर फोरम तसेच नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांनंतरही अद्याप कोणताही ठोस परिणाम दिसून आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून पर्यटकांना गोव्यात येण्यासाठी आमंत्रित करत असताना कोलवा सारख्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्याची अशी दुर्दशा होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाबाबत सरकारकडून ठोस राजकीय इच्छाशक्ती दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT