पणजी: पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना व मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यावेळच्या युपीए सरकारने त्यांची विविध प्रकरणी चौकशी सुरू केली. त्यावेळी मोदी व पर्रीकर यांनी कायद्याचे पालन करून अनेकवेळा चौकशीला सहकार्य केले. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजून अटकेला विरोध करत आहेत. हे हास्यास्पद आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी केली. Goa BJP
पणजी येथील कार्यालयात आज (दि.२२) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संकल्प आमोणकर व प्रवक्ते प्रेमानंद म्हाबरे उपस्थित होते. Goa BJP
यापूर्वी केजरीवाल यांनी भ्रष्टाचार्यांची यादी जाहीर करून त्याना तुरुंगात का टाकले जात नाही. ईडी, सीबीआय बंद करा, अशी मागणी केली होती. राहुल गांधी व सोनिया गांधी यांना अटक करण्याची मागणी करणारे सत्तेसाठी त्यांच्या जोडीला जाऊन बसले. अशी टीका अॅड. नाईक यांनी यावेळी केली. आम आदमी पक्षाचे माजी मंत्री खासदार मद्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात आहेत. भ्रष्टाचार प्रकरणी अटक झालेली असल्याने केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अॅड. नाईक यांनी केली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केजरीवाल दोषी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केजरीवाल यांना अटक झाली म्हणून आंदोलन करणार्यांनी केजरीवाल यांचे जुने व्हिडिओ पहावेत, असा सल्ला यावेळी संकल्प आमोणकर यांनी दिला. राहुल गांधी यांनी हिंदू नारी शक्तीवर जी टीका केली आहे. त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी म्हांबरे यांनी केली.
आपली बँक खाती भाजपने सीझ करण्यास लावल्याची काँग्रेसची तक्रार अनाठायी आहे. नियमानुसार प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेसने देशाची दिशाभूल करू नये, असे म्हांबरे यांनी म्हटले आहे.
मद्य घोटाळ्यातील पैसा चेन्नईमार्गे आम आदमी पक्षाने गोव्यात पाठवला. घोटाळ्याचे सुमारे 45 कोटी गोव्याच्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेल्या आपच्या उमेदवारांनी खर्च केल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे आपच्या गोव्यातील सर्व उमेदवारांची चौकशी करावी. त्यांना नेमके किती व कुठून पैसे मिळाले, याचा तपास करावा, अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी यावेळी केली.
हेही वाचा