CM Pramod Sawant pudhari photo
गोवा

CM Pramod Sawant | "60 हजार कर्मचारी असूनही कामे रखडतायत!" मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिकाऱ्यांची घेतली चांगलीच शाळा

CM Pramod Sawant | राज्यात ६० हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी असूनही नागरिकांची साधी शासकीय कामे वेळेत होत नसल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव, (पुढारी वृत्तसेवा):

राज्यात ६० हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी असूनही नागरिकांची साधी शासकीय कामे वेळेत होत नसल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारी कार्यालयांमधील दिरंगाई आणि नागरिकांची होणारी सतावणूक थांबवून लोकांच्या कामांना प्राधान्य द्या, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. केवळ आश्वासने न देता नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यावर भर देण्याचे त्यांनी बजावले.

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांच्या उपस्थितीत दवर्ली, मडगाव येथील बाबू नाईक सभागृहात आयोजित 'सरकार तुमच्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्री नागरिकांशी संवाद साधत होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.

संबंधित खात्यांचे अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. नागरिकांना आवश्यक असलेले उत्पन्नाचे दाखले आणि रहिवासी दाखले मिळविण्यात होणारा विलंब तातडीने दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या दाखल्यांसाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाहीला गती द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासकामांना प्राधान्य देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि अभियंत्यांनी विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले. पंच आणि सरपंच यांनी उपस्थित केलेल्या स्थानिक प्रश्नांवरही वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

तक्रारींचे प्रत्यक्षात निराकरण करा...

सरकारी यंत्रणा अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित न राहता प्रत्यक्षात त्यांचे निराकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT