CM Dr. Pramod sawant pudhari photo
गोवा

Global Business Summit | 2047 च्या आधीच 2037 पर्यंत 'विकसित गोवा'चे ध्येय गाठणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Global Business Summit | मुख्यमंत्री प्रमोद सावंत : 'व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट 2026 'चे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०४७ पर्यंत 'विकसित भारत' हे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्याच्या उद्दिष्टापूर्वीच, म्हणजे २०३७ पर्यंत 'विकसित गोवा' हे ध्येय गाठण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा, ब्लू इकॉनॉमी आणि शाश्वत पर्यटन या क्षेत्रांत गोव्याला जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे आमचे स्वप्न आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि उद्योजकांनी गोव्याच्या विकासप्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये गुरुवारी 'व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट २०२६'चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या तीन दिवशीय परिषदेत उद्योगपती, धोरणकर्ते, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

गोव्याला व्यवसाय, नवोन्मेष, उद्योजकता आणि गुंतवणुकीचे जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाचे संचालक अंकित यादव, ज्येष्ठ उद्योगपती श्रीनिवास धेंपो, व्हायब्रंट गोवाचे अध्यक्ष रसिक नायक, चेअरमन राजकुमार कामत,

सरचिटणीस अजय ग्रामोपाध्ये, ग्लोबल बिझनेस समिटचे चेअरमन विनय वर्मा, जितेंद्र जोशी, आशिष कुमार, आरती निमकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, लॉर्ड उदय नागराजू, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु आणि सुनीलकुमार मुंजाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
'व्हायब्रंट गोवा' हे राज्याला जागतिक स्तरावर व्यवसाय, नवोन्मेष आणि गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

२०१९ मधील पहिल्या आवृत्तीपासून २०२४ मधील परिषदेमार्फत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि व्यावसायिक भागीदारीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अंतराळ तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, संरक्षण आणि नवोन्मेष या क्षेत्रांत वेगाने प्रगती करत आहे.

'स्टार्टअप इंडिया', 'मेक इन इंडिया' आणि 'नॅशनल सेमीकंडक्टर मिशन'सारख्या उपक्रमांमुळे तरुण आणि उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. या विकासप्रक्रियेत गोवा पूर्ण योगदान देण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना जागतिक बाजारपेठ देण्याचे प्रयत्न

२०२४-२५ या आर्थिक वर्षात गोव्याचे सकल राज्यांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) १.१२ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. विमानतळ, रस्ते आणि पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक तसेच 'गोवा स्टार्टअप पॉलिसी २०२५'मुळे राज्यात नव्या गुंतवणुकीला आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे.

कोडिंग, रोबोटिक्स आणि प्रगत तंत्रज्ञानावर भर देतानाच स्थानिक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
परिषदेत गोव्यातील गुंतवणुकीची क्षमता आणि विविध क्षेत्रांतील संधी अधोरेखित करणारी पुस्तके, अहवाल आणि उपक्रम सादर करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आफ्रिकी देशांचे उच्चायुक्त, राजदूत आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'द फ्युचर ऑफ आफ्रिका' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

याशिवाय 'इन्व्हेस्ट इन गोवा', 'मेड इन इंडिया', 'पणजी रोडमॅप टू नेट झिरो', 'बिझनेस गोवा' आणि 'इंडियाज मायनिंग सेक्टर' या पुस्तकांचेही प्रकाशन झाले. 'विकसित गोवा व्हायब्रंट गोवा अहवाल' आणि 'व्हायब्रंट गोवा ॲप'चे अनावरणही यावेळी करण्यात आले. ब्रिक्स-आसियान चेंबर ऑफ कॉमर्स, ब्रिक्स-आसियान इंडिपेंडंट कमिशन फॉर ट्रेड अँड इकॉनॉमी आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशन यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT