Goa Spiritual Tourism 
गोवा

Goa Spiritual Tourism |कळंगुटच्या किनाऱ्यावर रंगला भव्य 'समुद्र आरती' सोहळा 'गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल'ने वेधले जगाचे लक्ष

Goa Spiritual Tourism | केंद्रीय मंत्री चिराग पासवान : कळंगुट किनाऱ्यावर समुद्र आरतीचा सोहळा

पुढारी वृत्तसेवा

कळंगुट : पुढारी वृत्तसेवा

गोवा हा विविध संस्कृतींनी नटलेला प्रदेश आहे. त्याचबरोबर तो एक आध्यात्मिक भूमीही आहे. यापुढे गोव्यात येताना ही आध्यात्मिकता अनुभवण्यासाठी अवश्य या आणि येथील पुरातन मंदिरांचे दर्शनही जरूर घ्या, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी केले.

विश्वस्तरावर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना केवळ पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र म्हणून ओळख मिळावी, या उद्देशाने आयोजित 'गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल २०२६' अंतर्गत कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर समुद्र आरतीचा भव्य सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

सनातन गोवा ही परशुराम भगवानांची देवभूमी आहे. आज गोव्याचे मुख्यमंत्री धर्माच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहेत. संपूर्ण गोवा भगवामय झाला असून, गोवा भोगभूमी नसून योगभूमी आणि आध्यात्मिक भूमी म्हणून ओळख निर्माण व्हावी, यासाठी ब्रह्मेशानंद स्वामीजी कार्यरत आहेत, असे उद्गार अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी स्वामीजी यांनी काढले.

कार्यक्रमाची सुरुवात श्री शांतादुर्गा मंदिरात महापूजनाने झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या नादात, जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात संत-महंतांच्या पावन सान्निध्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री ज्ञानानंद तीर्थजी, महंत रवींद्रपुरी स्वामी, जगद्गुरु सतपंथाचार्य श्री ज्ञानेश्वरदेवाचार्यजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी धर्मदेव महाराज,

महामंडलेश्वर श्री जनार्दन हरि स्वामीजी, अनंत श्री विभूषित श्री श्री १०८ तपोनिष्ठ अग्निहोत्री पूज्य स्वामी सम्पूर्णानंद ब्रह्मचारीजी, गोस्वामी सुशिल महाराज, महामंडलेश्वर नारायणानंद गिरिजी महाराज, सनातन धर्मभूषण डॉ. राजराजेश्वर गुरुजी, स्वामी आशुतोषानंद, अनंतबोध चैतन्य स्वामी, महामंडलेश्वर राधे राधे बाबा, अनंत श्री विभूषित भूपेंद्रगिरीजी, संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज, स्वामी श्री अनंतानंद, महामनीषी श्री निरंजन स्वामीज आदी उपस्थित होते.

चिराग पासवानसारख्या युवा नेत्याचा आदर्श घ्या : सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी

लोकप्रिय युवा केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे आजच्या युवांसाठी आदर्श आहेत. गोव्यातील सर्व युवकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी चिराग पासवानसारख्या युवा नेत्याचा आदर्श घ्यावा. भारत देशाला प्रगतीच्या उंच शिखरावर नेण्याचे कार्य ते करत आहेत. आज गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल गौमातेच्या इच्छेने संपन्न होत आहे.

या माध्यमातून संपूर्ण विश्वाला आवाहन आहे की, गोव्यात योग आणि संस्कृती शिकण्यासाठी या. गोव्याची परंपरा 'अतिथी देवो भव' अशी आहे. सर्व संत-महंतांना विनंती आहे की, ज्या-ज्या ठिकाणी आपण जाल, तेथे आपल्या शिष्यांसमोर गोव्याची खरी ओळख अवश्य मांडावी, असे आवाहन पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT