पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल येथील कदंब पठार परिसरात तोय्यार तलाव व पाणथळ जागेवर प्रस्तावित असलेल्या 'युनिटी मॉल' प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी साखळी उपोषण रविवारपासून (२८ रोजी) सुरू केले. हे उपोषण ३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाला न्यायालयाने स्थगिती देऊनही काम सुरू ठेवण्यात आल्याने संघर्षाची ठिणगी पेटली आहे.
पर्यावरणाला मोठा धोका अपेक्षित असल्याने हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकारने तत्काळ या प्रकल्पाला दिलेल्या सर्व परवानग्या रद्द कराव्यात, न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा आणि स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच कोणताही विकास प्रकल्प राबवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
जोपर्यंत गोवा पर्यटन विकास महामंडळ हे काम थांबवत नाही तसेच न्यायालयाचा आदेश मानला जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. ज्या ठिकाणी युनिटी मॉल उभा राहत आहे, तो परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने चिंबल ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध केला आहे.
चिंबल ग्रामसभेत या प्रकल्पाच्या चर्चा होऊन त्याला परवानगी देण्याचा ठराव फेटाळण्यात आला होता. मात्र त्याला पर्यटन विकास महामंडळाने त्याला गटविकास अधिकाऱ्यांकडे आव्हान दिल्याने त्याला २४ तासांत परवाना देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यावर त्याला ८ जानेवारी २०२६ पर्यंत स्थगिती दिली आहे.
मात्र ही स्थगिती असतानाच प्रस्तावित जागेत या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनही केले. हे काम कंत्राटदाराने सुरू ठेवल्याने ते ग्रामस्थानी बंद पाडले. हे काम न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावरील निर्णय होईपर्यंत सुरू होऊ नये म्हणून ग्रामस्थानी कदंब पठार येथे उपोषण सुरू केले आहे.
तलावाच्या जतनाकडे दुर्लक्ष...:
प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्प उभा राहत आहे त्या जागेला इतिहास आहे. या ठिकाणी असलेल्या तोय्यार तलावाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता. जेव्हा पणजीमध्ये पाणीटंचाई झाली होती तेव्हा याच तलावातून पाणीपुरवठा करण्यात आला होता.
टोय्यार तलावावर होणार परिणाम :
शिरोडकर चिंबल जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर म्हणाले की, या प्रकल्पामुळे टोय्यार तलावाच्या जैवविविधतेवर परिणाम होणार असून परिसरातील पाणीस्त्रोत, शेती व पर्यावरण धोक्यात येईल. युनिटी मॉलसारख्या मोठ्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि स्थानिक जीवनशैलीवरही विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याचे ते म्हणाले.