पणजी : पुढारी वृत्तसेवा
कदंबा पठार येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला होऊ घातलेल्या प्रशासन स्तंभ आणि युनिटी मॉल या सरकारी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी चिंबल मधील काही नागरिकांनी रविवार पासून सुरू केलेले साखळी उपोषण मंगळवारीही सुरूच राहिले.
सोमवारी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी तेथे जाऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. तर मंगळवारी आरजी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब व आपचे नेते अॅड. अमित पेलकर यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.
या दोन्ही नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. लोकांच्या मागणीवर सरकारने विचार करून येथील हे प्रकल्प इतरत्र नेण्याची मागणी परब यांनी केली. चिंबल नागरिकांना हे प्रकल्प नको असे सांगत हे उपोषण करण्यात येत आहे.
मात्र तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात लोक या आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे जे लोक आंदोलन करत आहेत त्याना जास्त लोकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन काही नेते मंडळी करूत आहेत. जो पर्यंत मोठ्या प्रमाणात लोक आंदोलनात सहभागी होत नाहीत तो पर्यंत आंदोलनाची दखल सरकार घेणार नाही असे काही एक्टीव्हीस्ट म्हणत आहेत.
४ रोजी सभेचे आयोजन ४ जानेवारी रोजी
चिंबल नागरिकांनी सभेचे आयोजन केले आहे, त्या सभेला किती प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळतो त्यावर या आंदोलनाचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांचे नेते गोविंद शिरोडकर यांनी या दोन्ही प्रकल्पांना चिंबल वासीयांचा विरोध असल्याचे सांगत ते दोन्ही प्रकल्प काही झाले तरी आम्ही होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा :
मंत्री रमेश तवडकर राज्यातील कुठल्याही भागांमध्ये आदिवासीतर्फे ज्या काही घडामोडी चालू असतात त्यावर आपले बारीक लक्ष असते. चिंबल येथील प्रकल्पाच्या विरोधात काही आदिवासी नागरिक सरकारी प्रकल्पाविरोधात उपोषण करत आहेत.
त्यावरही आपले लक्ष आहे. आपण या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत तोडगा निघेल, अशी माहिती आदिवासी नेते आणि कला व संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी पणजी येथे बोलताना दिली.