पणजी : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग - ६६ वरील कुंकळ्ळी ते बेंदोर्ड महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी १८८०.११ कोटींच्या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात कुंकळ्ळी आणि बाळ्ळी बायपासचाही समावेश असून, दक्षिण गोव्याच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. या प्रकल्पामुळे शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होईल, दैनंदिन प्रवास सुलभ होईल आणि दक्षिण गोव्याच्या आर्थिक वाढीस चालना मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकल्पाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ५.७८ किमी लांबीचा सहा-पदरी उड्डाणपूल (इलिव्हेटेड कॉरीडोअर), कुंकळळी व बाळ्ळी शहरांसाठी बायपास, मोठा सहा-पदरी रेल्वे उड्डाणपूल, तसेच सर्विस रस्ते, चौक आणि पादचारी सुरक्षेत सुधारणा यांचा समावेश आहे.