गोवा राज्यात कॅन्सरचे प्रमाण वाढले Pudhari File Photo
गोवा

गोवा राज्यात कॅन्सरचे प्रमाण वाढले

दहा वर्षात ब्रेस्ट कॅन्सरने 1002 तर गर्भाशयाच्या कॅन्सरने 441 महिला दगावल्या

करण शिंदे

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कर्करोगाचे प्रमाण चिंता करण्यासारखे वाढले असून महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण त्यात जास्त आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिलेल्या माहितीतून देशातील कॅन्सरच्या वाढीची धक्कादायक माहिती स्पष्ट झाली आहे. आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात गोव्यात स्तनाच्या कॅन्सरमुळे दर महिन्याला सरासरी 8 महिला मृत्युमुखी पडतात. दर महिन्याला सरासरी 3 महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत आहे. या लेखी उत्तरानुसार 2014 ते 2023 या दहा वर्षांत गोव्यात 1,002 महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू झाला तर याच दहा वर्षात गर्भाशयाच्या कर्करोगामुळे 441 महिला दगावल्या. खासदार शफी परांबील यांनी देशातील कॅन्सर मृत्यूबाबत अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यांना उत्तर देताना जाधव यांनी गोव्याबाबत वरील माहिती दिली.

10 वर्षांत देशामध्ये ब्रेस्ट कॅन्सरमुळे 7 लाख 36 हजार 579 महिलांचा मृत्यू

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्प राबवत आहे. यानुसार 2014 ते 2023 मधील देशभरातील कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी काढण्यात आली आहे. या दहा वर्षांत गोव्यात 1,002 महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. यामध्ये 2023 मध्ये सर्वाधिक 110 मृत्यू झाले आहेत. 2022 मध्ये 109, 2021 मध्ये 106, तर 2020 मध्ये 103 महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. या दहा वर्षांत संपूर्ण देशात 7 लाख 36 हजार 579 महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला.

याशिवाय 2014 ते 2023 दरम्यान गोव्यात 441 महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. 2023 मध्ये सर्वाधिक 48 महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. 2021 आणि 2022 मध्ये प्रत्येकी 47, 2020 मध्ये 46, 2019 मध्ये 44, 2018 व 2017 मध्ये प्रत्येकी 43, 2016 मध्ये 42, 2015 मध्ये 41, तर 2014 मध्ये 40 महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला.या दहा वर्षांत संपूर्ण देशात 3 लाख 51 हजार 432 महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता.अशी माहिती जाधव यांनी दिली. केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सर्व राज्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्यात येते. या मिशन अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणे, कर्करोग होऊ नये याबाबत जनजागृती करणे, पूर्वनिदान करणे, ब्रेस्ट स्कॅनिंग करणे असे विविध उपाय केले जात आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना लस देण्याबाबतही केंद्र सरकारचा विचार सुरू आहे. असे जाधव यांनी सांगितले.

गोव्यात फिरते रुग्णालय सुरू

गोवा सरकारने राज्यात वाढलेल्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी करोडो रुपयाचे कर्करोग निदान फिरते वाहन सुरु केले आहे. या वाहनांत कर्करोग निदान करण्याच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. राज्यातील विविध आरोग्य केंद्रात हे वाहन फिरत आहे. महिलांना स्तनांची तपासणी या वाहनात करून घ्यावी तसेच इतर लोकांनीही लक्षणे दिसत असल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT