goa canacona jaldoot gets prime minister recognition
पणजी : पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष असलेल्या काणकोणातील लोलये भागात राहणाऱ्या ७७ वर्षांच्या बाळकृष्ण गणेश अय्या या अभियंत्यांनीही नाकारलेल्या मही-तळप येथे पेन्शनमधून ४० फूट खोल विहीर खोदली. इतकेच नव्हे, तर त्या विहिरीचे पाणी स्वखर्चाने २५ कुटुंबीयांना पोहोचवले. त्याच्या या कार्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतली. बाळकृष्ण अय्या हे बाळकृष्ण अय्या मूळचे काणकोणच्या लोलये गावचे रहिवासी असून ते एक निवृत्त कला शिक्षक आहेत. त्यांच्या घराभोवतीचा परिसर पूर्णपणे खडकाळ आहे.
या भागात पाण्याचा थेंबही मिळणे कठीण असल्याने मोठे अभियंते आणि पाणी तज्ज्ञ या जमिनीला निरुपयोगी ठरवून निघून गेले होते. वर दगड, खाली चिकणमाती आणि त्याखाली गडद काळा कठीण पाषाण अशा आव्हानात्मक रचनेमुळे इथे पाणी मिळणे निव्वळ अशक्य असल्याचे सर्वांचे मत होते. मात्र, जेव्हा संपूर्ण गावाने उन्हाळ्यात पाण्याच्या तीव्र टंचाईसमोर शरणागती पत्करली होती, तेव्हा अय्या यांच्या डोळ्यांनी दगडांच्या आत दडलेला आशेचा किरण पाहिला. लोकांनी त्यांना वेड्यात काढले, पैसे वाया घालवत असल्याची टीका केली; पण अय्या यांनी स्वतः विहीर खोदण्याचे काम सुरू केले. तब्बल ४० फुटांची खोली गाठल्यानंतर त्या कठीण पाषाणातून पाण्याचा झरा वाहू लागला.
बालकृष्ण यांनी त्या विहिरीचे पाणी फक्त स्वतःच्या घरापुरते मर्यादित न ठेवता, खाली पंप बसवून स्वतःच्या खर्चाने गावभर पाईपलाईनचे जाळे विणले. मड्डी तळप परिसरातील २५ हून अधिक गरीब आणि गरजू कुटुंबांच्या मोफत आणि शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचत आहे. या अवलियाच्या अफाट इच्छाशक्तीची आणि समाजसेवेच्या अनोख्या पॅटर्नची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात घेतली असून, गोव्याच्या या सुपुत्राचे कार्य देशासमोर कौतुकाचा विषय बनले आहे.